मतमोजणीची तयारी पूर्ण

By Admin | Updated: May 15, 2014 01:03 IST2014-05-15T01:03:32+5:302014-05-15T01:03:32+5:30

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी दि.१६ मे रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय

Preparation for counting is complete | मतमोजणीची तयारी पूर्ण

मतमोजणीची तयारी पूर्ण

दुपारी ४ पर्यंत येणार निकाल, पोलिसांचा शहरात तगडा बंदोबस्त ८४ टेबलवर होणार एकाचवेळी मतमोजणी

भंडारा :

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी दि.१६ मे रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात होत आहे. मतमोजणीला सकाळी ८ वाजता प्रारंभ होणार असून अंतिम निकाल सायंकाळी ४ पर्यंत घोषित होईल. मतमोजणीची तयारी पुर्ण झाली असून त्यासाठी ३०० कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची निवडणुक दि. १० एप्रिल रोजी पार पडली. त्यानंतर सर्व ईव्हीएम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील स्ट्राँगरुममध्ये पोलिसांच्या चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्या आहेत. दि. १६ मे रोजी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. सर्वप्रथम टपाली पतपत्रिकेची मतमोजणी होईल. त्यानंतर विधानसभा क्षेत्रनिहाय एकाचवेळी मतमोजणी होणार आहे.

मतमोजणी केंद्रात सर्व सहा विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रत्येकी १४ टेबलची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक टेबलवर मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक व सुक्ष्म निरिक्षक अशा तीन अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे एकूण मतदान केंद्राप्रमाणे आवश्यक फेर्‍या निश्चित करण्यात आल्या आहेत. तुमसर विधानसभा क्षेत्रासाठी २६ मतमोजणी फेर्‍या होतील. भंडारा क्षेत्रासाठी ३१, साकोली क्षेत्रासाठी २७, अर्जुनी (मोरगाव) क्षेत्रासाठी २२, तिरोडा क्षेत्रासाठी २१ तर गोंदिया विधानसभा क्षेत्रासाठी २४ फेर्‍यांची संख्या निश्चीत करण्यात आली आहे.

मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर प्रत्येक उमेदवाराला मिळालेली मते जाहीर करण्यात येतील. सात तासात मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल, असे नियोजन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे. मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व ईव्हीएम पुन्हा सील करण्यात येतील. टपाली मतमोजणीसाठी दोन स्वतंत्र टेबल भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील सैनिक मतदारांना ३,५२६ मतपत्रिका पाठविण्यात आलेल्या असून निवडणूक कर्तव्यात नेमणूक झालेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना १,४९५ मतपत्रिका पाठविण्यात आले आहे. यानुसार ५,०२१ टपाली मतपत्रिका पाठविण्यात आलेले असून दि. १३ मे पर्यंत मतदान होऊन ९५९ टपाली मतपत्रिका प्राप्त झालेले आहेत. पत्ता बरोबर नसल्यामुळे, राहत नसल्यामुळे, पत्ता बदलल्यामुळे व अन्य कारणास्तव मतदान न होता एकूण २,५५९ टपाली मतपत्रिका परत आलेल्या आहेत. टपाली मतपत्रिकांच्या मोजणीसाठी दोन टेबलची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. (जिल्हा प्रतिनिधी) शहरात पोलिसांची चोख सुरक्षा तैनात ४मतमोजणीसाठी नागरिकांची मतमोजणी केंद्राजवळ हजारोंची गर्दी होणार असल्यामुळे सामाजिक न्याय भवनाच्या आत व बाहेरील परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक तसेच या मार्गाला मिळणारे अन्य अंतर्गत मार्ग रहदारीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरील जड वाहतूक बायपास मार्गावरून वळविण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांसह पॅरामिलिटरी फोर्स, राज्य राखीव पोलीस दल व पोलीस जवान ठिकठिकाणी तैनात करण्यात येणार आहे. ४जिल्हा पोलीस प्रशासनाकडून पाच पोलीस उपअधीक्षक, ७ पोलीस निरीक्षक, ७६ पोलीस उपनिरीक्षक व ९१० पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय शहरातील प्रत्येक चौकात पोलिसांचा बंदोबस्त राहणार असून साध्या वेशातील पोलिसांचीही बारीकसारीक घटनेवर नजर राहणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा परिषद चौकातून होणारा प्रवेश बंद करण्यात आला आहे. मतमोजणीकरीता येणारे उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी यांच्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था गणेश हायस्कूलच्या प्रांगणात करण्यात आलेली आहे. सामाजिक न्याय भवनात मतमोजणी परिसरात कुणालाही मोबाईल किंवा ईतर ईलेक्ट्रानिक वस्तू नेता येणार नाही.

Web Title: Preparation for counting is complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.