कोरोनाच्या प्रभावात गरोदर मातांची फरफट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:37 IST2021-04-23T04:37:47+5:302021-04-23T04:37:47+5:30
वरठी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अन्य आजारांकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. जुन्या आजारग्रस्त रुग्णांना उपचार मिळणे कठीण झाले आहे. ...

कोरोनाच्या प्रभावात गरोदर मातांची फरफट
वरठी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अन्य आजारांकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. जुन्या आजारग्रस्त रुग्णांना उपचार मिळणे कठीण झाले आहे. वैद्यकीय यंत्रणा हतबल आहे. या भानगडीत गरोदर मातांची फरफट होत आहे. आयुष्याच्या वेलीवर उमलणाऱ्या फुलाच्या आनंदात कोरोनाच्या संकटाने विरजण घातले आहे. अनेकांना उपचाराबद्दल साशंकता निर्माण झाली असून, सुरक्षित ठिकाणाचा शोध वाढला आहे. हे सर्वांना परवडणारे नाही. यासाठीही त्यांची फरफट थांबवणे आवश्यक आहे.
एक वर्षापासून कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. मधला काही काळ निवांत गेला; पण दोन महिन्यांत कहर झाला आहे. पूर्वीच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण वाढल्याने नागरिकांत कमालीची दहशत आहे. वैद्यकीय यंत्रणाही घाबरलेली असून, उपचार मिळणे कठीण झाले. डोळ्यादेखत जीव जात असल्याचे विदारक दृश्य कुटुंबियांना पाहायला मिळत आहे. कोरोनाने अख्ख्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.
खासगी व सरकारी रुग्णालयांत नियमित औषधोपचार घेणारे अनेकजण आहेत. यात जुन्या व्याधीने त्रस्त नागरिकांसह गरोदर मतांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. सरकारी रुग्णालयांत गरोदर महिलांचे नियमित तपासणी केंद्र आहे. यासह अनेकजण खासगी रुग्णालयांतसुद्धा नियमित उपचार घेऊन तपासण्या करवून घेतात. कोरोनाच्या प्रभावाने सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालये कोविड उपचार केंद्रात रूपांतरित झाली. यामुळे गरोदर मातांमध्ये असुरक्षितता वाढली आहे. नियमित तपासणी होणे आवश्यक आहे. पण घराबाहेर पडल्यास संक्रमण होण्याची भीती आहेच. त्यामुळे अनेक गरोदर महिला संकटात सापडल्या आहेत.
नियमित तपासणीकरिता कोविड तपासणी अहवाल लागतो. त्याशिवाय डॉक्टर उपचाराला सुरुवात करीत नाहीत. यात त्यांचा दोष नाही; पण रिस्क वाढल्याने गरोदर मातांचे बेहाल होत आहेत. सरकारी व खासगी रुग्णालयांत गरोदर महिलांच्या उपचाराची स्वतंत्र व्यवस्था करण्याची गरज आहे. खासगी व सरकारी रुग्णालयांत प्रसूती विभाग आहे. हा विभाग प्रसूतीकरिता गर्दीपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. वेळेवर उद्भवणाऱ्या परिस्थितीने अनेक समस्या उद्भवत आहेत. जिल्हा यंत्रणेने वेगळी व्यवस्था करण्याची गरज आहे.
बॉक्स
कोरोना टेस्टशिवाय उपचार नाही
शासकीय रुग्णालयात सुरळीत तपासण्या व औषधोपचार सुरू आहेत; पण खासगी आरोग्य यंत्रणा कोरोना टेस्टशिवाय हात लावत नाही. नाजूक परिस्थितीत गरोदर महिलांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रसूतीदरम्यान त्यांना संकटांना सामोरे जावे लागले, तर जिवाचा धोका आहे.
आरोग्य व्यवस्थेला खीळ
कोरोनाच्या प्रभावात आरोग्य कर्मचारी सुटले नाहीत. अनेक आरोग्यसेवक कोरोनाबाधित असल्याने आरोग्य व्यवस्थेला खीळ बसली आहे. वरठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ४ आरोग्यसेवक, १ पर्यवेक्षक यासह वैद्यकीय अधिकारी कोरोनाबाधित असल्याने संपूर्ण भार एकट्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आहे. आरोग्य सेवा देणारी यंत्रणा एका दिवसात उभी करता येत नाही. त्यासाठी शिक्षण व अनुभव कामी पडतो. आरोग्य व्यवस्था कोरोनाग्रस्त होण्याचे प्रकार वाढल्याने परिस्थिती कठीण होत आहे. आरोग्यसेवकांचा बाधित होण्याचा आकडा मोठा आहे.
बॉक्स
माहेरचा जिव्हाळा मुरला
गरोदर महिलांच्या माहेरच्या माणसांना जिव्हाळा असतो. बहुतेक बाळंतपण हे माहेरच्या देखरेखीत होतात. घरात मुलं येणार म्हणून कुटुंब आनंदात असते. पण कोरोनाच्या सावटात जिव्हाळा मुरल्याचे दिसते. कुटुंबावर असलेले कोरोनाचे संकट व बाहेरची परिस्थिती लक्षात घेऊन अनेकांना जिव्हाळा असूनही काहीच करता येत नाही. प्रसूतीदरम्यान काळजी घेणाऱ्याची फार गरज असते. पण सध्याच्या परिस्थितीने चित्र बदलले आहे.
गरोदर महिलांसाठी वेगळ्या व्यवस्थेची गरज
कोरोनाच्या लढाईत सामान्य रुग्णालयांचे रूपांतर कोविड रुग्णालयात झाले. यामुळे तेथील वातावरण त्यांच्यासाठी सुरक्षित नाही. कोरोनाच्या गर्दीत त्यांना सुरक्षितता महत्त्वाची आहे.