प्रधानमंत्री आवास योजना लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2016 01:05 IST2016-10-23T01:05:57+5:302016-10-23T01:05:57+5:30
केंद्र शासनाने इंदिरा आवास योजनेचे रूपांतर प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मध्ये केले असून राज्यात

प्रधानमंत्री आवास योजना लागू
शासन निर्णय जारी : योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
साकोली : केंद्र शासनाने इंदिरा आवास योजनेचे रूपांतर प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मध्ये केले असून राज्यात या योजनेची अंमलबजावणी सन २०१६-१७ या आर्थिक वर्षापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधी शासनाच्या ग्रामविकास विभागाने शासन निर्णय निर्गमित केले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत नवीन मंजूर घरकुलांकरीता साधारण क्षेत्राकरीता एक लाखऐवजी १.२० लाख व नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्राकरीता १.१० रूपये लाखऐवजी १.३० रूपये लाख इतकी किंमत निश्चित केली आहे. पुर्वीच्या इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे क्षेत्रफळ २० चौरस मीटरवरून वाढवून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत २५ चौरस मीटर एवढे करण्यात आले आहे. यासाठी लाभार्थ्यांची निवड सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण २०११ अनुसार करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत केंद्र व राज्य हिस्सा ६०.४० प्रमाणानुसार राहणार असून राज्याचा साधारण क्षेत्राकरीता ४८ हजार व नक्षलग्रसत व डोंगराळ क्षेत्राकरीता रूपये ५२ हजार याप्रमाणे हिस्सा राहील. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत संवर्गनिहाय राज्याचा निधी सर्वसाधारण संवर्गाकरिता ग्रामविकास विभाग, अनुसूचित जाती संवर्गाकरिता सामाजिक न्याय विभाग, अनुसूचीत जमातीकरीता आदिवासी विकास विभाग व अल्पसंख्यांक संवर्गाकरीता अल्पसंख्यांक विकास विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येईल. राज्य शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार बाळा काशिवार यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)