रिमझीम पावसातही शक्तिप्रदर्शन
By Admin | Updated: October 13, 2014 23:18 IST2014-10-13T23:18:06+5:302014-10-13T23:18:06+5:30
बुधवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा आज मंगळवारला सायंकाळी थंडावल्या. दरम्यान आज दुपारी सर्वच पक्षांनी दुचाकी रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. सकाळपासूनच रिमझिम

रिमझीम पावसातही शक्तिप्रदर्शन
भंडारा : बुधवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा आज मंगळवारला सायंकाळी थंडावल्या. दरम्यान आज दुपारी सर्वच पक्षांनी दुचाकी रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. सकाळपासूनच रिमझिम पावसाने हजेरी लावली. परंतु पावसाला झुगारुन शिवसेना आणि बहुजन समाज पार्टीने शहरातून रॅली काढली.
१५ आॅक्टोबरला होणाऱ्या निवडणुकीची अधिसुचना १२ सप्टेंबरपासून लागू झाली. सर्व प्रक्रिया आटोपून उमेदवारांना प्रचारासाठी केवळ १३ दिवसांचा कालावधी मिळाला. यादरम्यान सर्वच उमेदवारांनी जिवाचे रान करीत प्रचार केला. पहिल्यांदा नामांकन दाखल करताना आणि दुसऱ्यांदा प्रचार संपण्याच्या वेळेपूर्वी शक्तीप्रदर्शन करीत मिरवणुका काढल्या. यावेळी उमेदवारांनी प्रचार साहित्यासह डिजेचा वापर करून नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
शिवसेनेची दुचाकी महारॅली
प्रचाराची रणधुमाळी सायंकाळी संपली. शिवसेनेच्यावतीने मंगळवारला भंडारा आणि पवनी शहरातून मिरवणूक काढून शहरात वातावरण निर्मिती केली. मतदानाला काही तासांचा कालावधी शिल्लक असल्यामुळे उमेदवारांनी आता गुप्त प्रचारावर भर द्यायला सुरुवात केली आहे. या मिरवणुकीत शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह जिल्हाप्रमुख राधेश्याम गाढवे, उपजिल्हाप्रमुख प्रशांत लांजेवार, अनिल गायधने, सुनिल कुरंजेकर, तालुकाप्रमुख हेमंत बांडेबुचे, विजय काटेखाये यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. या मिरवणुकीत शेकडो दुचाकीस्वार झेंडे घेऊन सहभागी झाले होते. पवनी शहरातून शुभारंभ झालेली ही रॅली कोंढा, अड्याळमार्गे भंडारा येथे पोहोचली. यात विजयाची घोषणा देण्यात आल्या. या रॅलीत तरुणांची संख्या अधिक होती.
बसपाच्या रॅलीने शहर दुमदुमले
निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी देवांगणा गाढवे यांनी भंडारा शहरात प्रचार रॅली काढून वातावरण निर्मिती केली. महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असलेल्या या रॅलीतद्वारे महिलांनी शहर पिंजून काढले. रिमझिम पावसातही कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाहत होता. नागपूर नाका येथून प्रारंभ झालेल्या रॅलीने तकीया वॉर्ड, राजीव गांधी चौक, खांबतलाव, खात रोड आणि शहराच्या अन्य भागातून संपर्क अभियान राबविले. ठिकठिकाणी महिलांनी देवांगणा गाढवे यांचे स्वागत केले. बसपाच्यावतीने दसरा मैदान येथूनही दुचाकी रॅली काढण्यात आली. नागपूर नाक्यापासून सुरु झालेली ही रॅली श्हरातील सर्वच मार्गाने भ्रमण केली. यावेळी देवांगणा गाढवे यांनी मतदारांना अभिवादन करीत होत्या. या रॅलीत बसपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाढवे, जिल्हा प्रभारी संजय भिवगडे, प्रिया शहारे, सुरेश कोहळे, हेमलता गजभिये, मनोरमा मोटघरे, किरदास मेश्राम, विजय रंगारी, मनोज गोस्वामी, महेश मेश्राम, कुजन शेंडे, प्रेम वासनिक, राजू गजभिये, भीमराव बोरकर, भैय्यालाल गजभिये, नरेश मेश्राम, संजय गजभिये यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सर्वच पक्षांच्या मिरवणुका
आज मंगळवारला सायंकाळी प्रचारतोफा थंडावणार असल्यामुळे शिवसेना, बहुजन समाज पार्टी, भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षांच्यावतीने त्या-त्या विधानसभा क्षेत्रात मिरवणूक काढून वातावरण निर्मिती करण्यात आली. आता छुपा प्रचार सुरू झाला आहे.
(प्रतिनिधी)