वीज मिटर ‘फॉल्टी’ शेतकऱ्याला मनस्ताप
By Admin | Updated: November 27, 2014 23:29 IST2014-11-27T23:29:31+5:302014-11-27T23:29:31+5:30
शेतशिवारात लावण्यात आलेल्या कृषीपंपाचे मिटर फॉल्टी असल्यामुळे त्याचा फटका एका शेतकऱ्याला बसला आहे. वीज वितरण कंपनीने या शेतकऱ्याला २२ हजार ५० रुपयांचे बिल पाठविले आहे.

वीज मिटर ‘फॉल्टी’ शेतकऱ्याला मनस्ताप
भंडारा : शेतशिवारात लावण्यात आलेल्या कृषीपंपाचे मिटर फॉल्टी असल्यामुळे त्याचा फटका एका शेतकऱ्याला बसला आहे. वीज वितरण कंपनीने या शेतकऱ्याला २२ हजार ५० रुपयांचे बिल पाठविले आहे. त्यामुळे या शेतकऱ्याची भंबेरी उडाली आहे. मारोती पैकूजी गभणे रा.जमनी असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
गभणे यांनी कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात मिटर फॉल्टी नसतानाही विद्युत बिल वाढीव का येत आहे याबाबत विचारणा केली होती. तसेच जर मिटर फॉल्टी असेल तर ते बदलवून देण्याची मागणीही केली होती. वीज वितरण कार्यालयाच्या वारंवार हेलपाट्या मारल्यावर वीज मिटर बदलवून देण्यात आले नाही. मात्र त्यानंतरही हा प्रकार थांबला नाही. योजनेअंतर्गत या शेतकऱ्यााने दीड वर्षांपूर्वी जुनी रक्कम टप्प्याटप्प्याने भरली आहे. मात्र सप्टेंबर २०१४ चे वीज बिल पाहून गभणे या शेतकऱ्याची चांगलीच भंबेरी उडाली. वीज वितरण कार्यालयाने त्यांना २२ हजार ५० रुपयांचे बिल पाठविले. गभणे यांनी सप्टेंबर २०१२ मध्ये ३४३० रुपयांचे बिल भरले आहे. त्यानंतर २३ आॅगस्ट २०१३ रोजी त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना वीज मिटर फॉल्टी नसल्याबाबत निवेदन दिले होते. तसेच विद्युत बिल फॉल्टी म्हणून येत असल्यामुळे त्याची चौकशी करून रिडींगनुसार विद्युत बिल देण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यांच्या नावाने शेतात लावण्यात आलेला वीज मिटर चालू स्थितीत होता. त्यामुळे त्याचवेळी त्याची सहानिशा करणे गरजेचे होते. मात्र शेतकऱ्याच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही. त्यांचा ग्राहक क्रमांक ४३६०१०२००४८५ असा आहे. सद्यस्थितीत विद्युत पुरवठा बंद असतानाही फॉल्टीमिटर प्रमाणे बिल लावण्यात आले आहे. फॉल्टी असलेला विद्युत मिटर तत्काळ बदलवून सुव्यवस्थित विद्युत मिटर लावावे अशी मागणी त्यांनी त्यावेळी केली होती.
आजच्या स्थितीला त्यांच्या नावे २२ हजार रुपयांचे वीज बिल आल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. एकीकडे अस्मानी संकट तर दुसरीकडे सुलतानी संकटाला या शेतकऱ्याला तोंड द्यावे लागत आहे. विद्युत मिटरची योग्य प्रकारे चौकशी करून वीज बिलात सुधारणा करून देण्यात यावी अशी मागणी मारोती गभणे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)