येटेवाही जंगलात ‘जय’ असण्याची शक्यता

By Admin | Updated: July 31, 2016 00:18 IST2016-07-31T00:18:19+5:302016-07-31T00:18:19+5:30

आशिया खंडातील सर्वात मोठा वाघ म्हणून ओळख असलेला उमरेड-कऱ्हांडला राष्ट्रीय प्रकल्पातून १९ मेपासून सर्वच अभयारण्य पिंजूनही ‘जय’चा शोध लागलेला नाही.

The possibility of being 'Jai' in Yatevahi forest | येटेवाही जंगलात ‘जय’ असण्याची शक्यता

येटेवाही जंगलात ‘जय’ असण्याची शक्यता

घटना स्थळावर वाघाचे पदचिन्ह : अवघा महाराष्ट्र लागला जयला शोधायला
प्रकाश हातेल चिचाळ
आशिया खंडातील सर्वात मोठा वाघ म्हणून ओळख असलेला उमरेड-कऱ्हांडला राष्ट्रीय प्रकल्पातून १९ मेपासून सर्वच अभयारण्य पिंजूनही ‘जय’चा शोध लागलेला नाही. मात्र चिचाळ येथील माजी सरपंच मुनिश्वर काटेखाये हे लाखनीहून चिचाळ येथे कुटूंबियांसह येत असताना रात्रीच्या सुमारास पुरकाबोडी, तिर्री मार्गावर चार फुट उंचीचा पट्टेदार वाघ रस्त्याच्या कडेला त्यांना दिसला. काटेखाये यांनी ‘जय’ला कऱ्हांडला अभयारण्यात जवळून पाहिले असून त्यांना दिसलेला वाघ व घटना स्थळावरील पदचिन्ह आढळल्यामुळे पेंच व्याघ्र प्रकल्पाचे वनक्षेत्राधिकारी व डेहराडून व्याघ्र संस्थेला दिसलेला वाघ हा ‘जय’च असावा का? या दिशेने वनविभागाचा तपास सुुरू आहे.
‘जय’चा जन्म नागझिऱ्यात झाला तरी तो आपले स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण करण्यासाठी त्याने नागझिरा ते कऱ्हांडला हा आपला कॅरीडोर तयार केला. तीन वर्षापासून कऱ्हांडला ते ब्रम्हपुरी वनक्षेत्रात तो मुक्तपणे संचार करत होता. १७ एप्रिलनंतर त्याने उमरेड कऱ्हांडला हे क्षेत्र सोडल्याचे दिसून येते. परंतू ९ मे रोजी त्याचे अस्तित्त्व ब्रम्हपुरी वनक्षेत्रात आढळले. तेव्हापासून त्यांचे जीपीएस आणि रेडीओ सिग्नल मिळाले नाही. त्यामुळे वनखात्याची झोप उडाली. त्याच्या शोधात नागझिरा, न्यु नागझिरा, ताडोबा, उमरेड, कऱ्हांडला, पेंच, कोका हे सर्व अभयारण्य पिंजून काढले परंतू त्यांचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे वन्यप्रेमी व वनखाते चिंतेत असताना १२ जुलैला चिचाळचे माजी सरपंच मुनिश्वर काटेखाये हे लाखनीहून येत असताना पुरकाबोडी ओढ्याशेजारी पट्टेदार वाघ रस्त्याच्या कडेला दिसला. २० जुलैला रात्री खापा जंगलात १.१५ वाजता हरणाचा कळप दिसला सदर घटनेची माहिती वनक्षेत्राधिकारी प्रमोद महेशपाठक यांना कळविताच पेंच व्याघ्र प्रकल्पाचे चंद्रात्रे यांची चमू व डेहराडून व्याघ्र संस्थेची चमू व अन्य सेवाभावी संस्था ‘जय’चा शोध घेत आहेत. मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी नागपूर यांनी मुनिश्वर काटेखाये यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याकडून विचारपूस केली. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक भगवान यांनी काटेखाये यांनी सांगितलेल्या बाबीवरून तो मोठा वाघच असून आपले नवीन अस्तित्व तयार करण्यासाठी नविन टेरटेरी निर्माण करत आहे. हे ‘जय’च्या बाबतीत लागू पडते असे त्यांचे मत आहे. यावरून ‘जय’ हा येटेवाही परिसरात वास्तव्यास असावा, अशी शंका वर्तविली जात आहे. येटेवाही परिसरात दोन ते अडीच वर्षाची बाघीण आहे. त्यामुळे जयने तिथे नवीन घर तयार केले असावे, किंवा तो जन्मभूमित गेला तर नसावा, अशा शंकांना पेव फुटले आहे.

वाघ हा प्राणी आपली भ्रमंती वेगवेगळ्या ठिकाणी करत असतो. जर वाघाला नवीन मादी शोधण्याचे वेड असते. ‘जय’चे ते वैशिष्ट्य आहे. यापूर्वी नवीन मादी शोधण्यामुळे त्याचे स्थलातरण झाले आहे. त्यामुळे काटेखाये यांनी सांगितलेल्या परिसरात ‘जय’ येऊ शकतो.
- भगवान, प्रधान मुख्य वनसंरक्षक महाराष्ट्र.
या जंगलात आम्ही यापूर्वी कधीही एवढा मोठा वाघ पाहिला नाही परंतू काटेखाये यांनी पाहिलेला वाघ जर येथे असेल तर तो परिसरातील टेकडीवर राहू शकतो.
- राजेश वरखेडे, पोलीस पाटील, येटेवाही.
सरपंच काटेखाये यांनी दाखविलेल्या जागेवर वाघाचे पदचिन्ह आढळले आहे. ते एका मोठ्या वाघाचे पदचिन्ह आहे. परंतु ते पदचिन्ह ‘जय’चेच आहे, असे आजघडीला ठामपणे म्हणता येणार नाही.
- प्रमोद महेशपाठक, वनक्षेत्राधिकारी अड्याळ.

Web Title: The possibility of being 'Jai' in Yatevahi forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.