हरीण शिकारप्रकरणी एक ताब्यात
By Admin | Updated: October 15, 2016 00:28 IST2016-10-15T00:28:57+5:302016-10-15T00:28:57+5:30
हरणाची शिकार केल्यानंतर त्याचा मांसावर ताव मारण्यासाठी आणलेल्या मांसासह एकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

हरीण शिकारप्रकरणी एक ताब्यात
भंडारा वनविभागाची कारवाई : मुख्य आरोपीच्या शोधात पथक रवाना
भंडारा : हरणाची शिकार केल्यानंतर त्याचा मांसावर ताव मारण्यासाठी आणलेल्या मांसासह एकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई भंडारा वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी आज दुपारी २ वाजताच्या सुमारास आंबाडी येथे केली.
भंडारा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या आंबाडी येथील राहूल श्रीराम भुरे (२६) असे वन्यप्राण्यांच्या मासांसह चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे. राहूल याच्या घराचे बांधकाम सुरु आहे. दरम्यान कामावर मजूर असताना दुपारच्या सुमारास राहूलने वन्यप्राण्याच्या शिकारीचे मांस भाजी करण्यासाठी आणले. वन्यप्राण्याचे मांस असल्याने व वनविभागाच्या कारवाईच्या भितीने सदर मांसाची पिशवी घरालगतच्या संरक्षण भिंतीजवळील झुडपात दडवून ठेवली. ही बाब घराचे बांधकाम करणाऱ्या मजूरांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यानी राहूलला विचारणा केली असता. त्याने हरणाच्या शिकारीचे मांस असल्याचे मजुरांना सांगितले. यावेळी तेथून गावातीलच एक इसम जात होता. त्याने ही बाब लगेच भंडारा वनपरिक्षेत्राधिकारी डब्ल्यू. आर. खान यांना भ्रमणध्वनीवर सदर युवकाकडे वन्यप्राण्याचे मांस असल्याची सुचना दिली. यावरुन खान यांनी यांचे अधिनस्थ क्षेत्र सहायक गौरी नेवारे, क्षेत्र सहायक व्ही. टी. बागडे, वनपाल यु. बी. हटवार, बीटरक्षक टी. एच. घूले, बिटरक्षक आर. बी. पडोळे यांना आंबाडी गावात पोहचवून कारवाई करण्याचे निर्देश दिले. प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेवून व खान यांच्या निर्देशानुसार वनविभागाचे पथक आंबाडीतील राहूलच्या घरी दाखल झाले. यावेळी त्यांनी त्याच्याकडून वन्यप्राण्याचे शिकारीचे मांस जप्त केले. दरम्यान सदर मांसाची माहिती त्याच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला असता राहूलने उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यावर वनविभागाच्या पथकाने त्याला हिसका दाखविताच राहूलने सदर मांस नेरला येथून आणल्याची कबूली दिली. याप्रकरणी अधिक चौकशीसाठी वनविभागाने राहूलला ताब्यात घेतले आहे. त्याच्या माहितीवरुन रात्री उशिरा वनविभाच्या पथकाने नेरला येथे शिकार करणाऱ्या इसमाच्या घरी छापा घालण्याची तयारी चालविली होती.या प्रकरणाची कारवाई सुरुच आहे. सदर कारवाईत बीटरक्षक वर्षा दराडे, वनरक्षक व्ही. ए. नान्हे, वनरक्षक एस. एम. रामटेके, वाहनचालक अनिल शेडके, राजु वंजारी, वनपाल पप्पू सय्यद आदींचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)
नेरलात वनपथक दाखल
या शिकार प्रकरणी नेरला येथून वन्यप्राण्याचे मांस आणल्याची कबुली राहूलने दिली. नेरला हे अड्याळ वनपरिक्षेत्रात येते. येथील शिकाऱ्यांच्या घरांवर छापा घालण्यासाठी भंडारा वनपरिक्षेत्राअधिकारी खान यांनी उपवनसंरक्षक वर्मा व सहायक वनसंरक्षक चोपकर यांचे मार्गदर्शन घेतले असून यांच्या निर्देशानुसार रात्री उशिरा नेरला येथे छापा घालण्यासाठी पथक रवाना केले.
आंबाडी येथील राहूल भुरे याच्याकडे वन्यप्राण्याचे एक किलो मांस सापडले. मात्र सदर मांस हरिणाचे किंवा अन्य कुठल्या वन्यप्राण्याचे आहे. याबाबत अधिकृत सांगता येत नाही. जप्त केलेल्या मांस पशुवैद्यकिय अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनात तपासणीकरिता नागपूर येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येत आहे. प्रयोगशाळेतील अहवालानंतरच मांसाबाबद अधिकृत सांगता येईल. राहूलला चौकशीकरिता ताब्यात घेतले आहे.
- डब्ल्यू. आर. खान, वनपरिक्षेत्राधिकारी, भंडारा