लाेकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी परिसरातील मार्गाची भयावह दुरवस्था झाली आहे. सदर मार्ग मोहाडी जिल्हा परिषद व राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार क्षेत्रातील आहेत. मात्र, वारंवार मागणी करूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
करडी परिसरातील बहुतेक सर्वच मार्ग खड्ड्यांनी गजबजले आहेत. देव्हाडा ते पालोरा, मुंढरी ते करडी, पालोरा ते खडकी- ढिवरवाडा, बोरगाव ते पालोरा, मुंढरी खुर्द पोचमार्ग, मुंढरी बुज पोचमार्ग, निलज खुर्द पोच मार्ग, निलज बुज पोच मार्ग, पालोरा ते जांभोरा, करडी ते दवडीपार, निलज बुज, निलज खुर्द, मुंढरी बुज पोच मार्ग या रस्त्यांकडे कुणाचेही लक्ष नसल्याचे दिसून येते. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून, जीवघेणे ठरत आहेत नागरिकांची प्रकृती बिघडल्यास त्यांना औषधोपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे याच मार्गाने नेण्यात येते. मात्र, दुर्लक्षामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता नाही.
किरकोळ अपघात होण्याची बाब तर नित्याची होऊन बसली आहे. रस्त्याच्या संबंधाने अधिकाऱ्यांना अनेकदा माहिती देण्यात आलेली असताना अधिकारी कार्यालयात बसून दिवस काढण्यात व्यस्त असतात. करडी परिसरातील सर्वच रस्त्यावरील खडी उखडली असून, खोल खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. प्रवाशांसाठी रस्ते मृत्यूचा मार्ग ठरू पाहत आहेत. सदर मार्ग आता प्रवाशांच्या अंताची प्रतीक्षाच जणू करीत असल्याचे भासत आहे.