जलयुक्त शिवारातून तलावाची दुरूस्ती
By Admin | Updated: August 28, 2015 01:07 IST2015-08-28T01:07:04+5:302015-08-28T01:07:04+5:30
भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा आहे. जलयुक्त शिवार योजनेतून तलावाची दुरुस्ती करा, अशा सूचना जिल्हास्तरीय ...

जलयुक्त शिवारातून तलावाची दुरूस्ती
भंडारा : भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा आहे. जलयुक्त शिवार योजनेतून तलावाची दुरुस्ती करा, अशा सूचना जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा खासदार नाना पटोले यांनी दिल्यात.
जिल्हा परिषद सभागृहात जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करतांना खा. पटोले बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, जिल्हाधिकारी धीरजकुमार, मुख्य कायर्कारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, भारतीय प्रशासनिक सेवेतील परिविक्षाधिन अधिकारी पवनीत कौर उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. मनरेगा, कृषि विषयक कामे, नाला सरळीकरण, पिण्याचे पाणी, बी. आर.जी.एफ. अंतर्गत मिळालेल्या निधीचा यावेळी आढावा घेण्यात आला. एकात्मिक पाणलोट योजनेंतर्गत मजगी, शेततळे याबाबत झालेल्या कामाची चौकशी करण्यात येईल, असे खा. पटोले म्हणाले. कृषि विभागाच्या योजना चांगल्या प्रकारे राबविल्यास संपूर्ण गावाचा विकास होऊ शकतो. असेही ते म्हणाले. निर्मल भारत अभियानांतर्गत आरोग्य विभाग, नगर परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागांनी पिण्याच्या शुध्द पाण्यासाठी प्रस्ताव तयार करुन शासनाकडे पाठवावे अशा सूचना खा. पटोले यांनी दिल्या. राष्ट्रीय भूमी अभिलेख अंतर्गत ई-फेरफार, आखीव पत्रिका, रेकार्ड तयार करण्यात आल्याची माहिती भूमि अभिलेख अधिकाऱ्यांनी दिली.
राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत अंपग निवृत्ती वेतन, संजय गांधी निराधार योजनेंचा लाभ गरीब जनतेला मिळाला पाहिजे. राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियानांतर्गत बचत गटातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच आर्थिक सक्षम कसे करता येईल यासाठी जिल्हयात प्रशिक्षण केंद्र सुरु करावे. तसेच राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण योजनेअंतर्गत ग्रामपंचायत सदस्यांना प्रशिक्षण देण्यात यावेत, असे पटोले यांनी सांगितले. वन हक्क समितीने केलेल्या शिफारशींनुसार त्याची अंमलबजावणी केली पाहिजे व त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे, असे खा. पटोले म्हणाले. याबाबत अठराशे प्रकरणात वन जमिनीचे पट्टे देण्यात आले आहे, असे उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे यांनी सांगितले.
आदिवासी आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्यांच्या मृत्यु बाबत कलाम शेख यांनी मुद्दा उपस्थित केला. त्यावर खा. पटोले यांनी झालेल्या घटनेविषयी एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी यांना झालेल्या प्रकरणाची माहिती विचारली. तुमसरच्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले यांनी याबाबत चौकशी करण्यात येईल, असे सांगितले. तसेच साकोलीमध्ये झालेल्या आॅनलाईन घोटाळ्याबाबत उपजिल्हाधिकारी सुनिल पडोळे यांनी रक्कम मिळाली किंवा नाही याची पूर्ण चौकशी करावी, असे खा. पटोले म्हणाले. या बैठकीला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक जे. एन. जेजूरकर, सर्व पंचायत समिती सभापती, उपमुख्य कायर्कारी अधिकारी सुधाकर आडे, महावितरणचे अधिक्षक अभियंता सतिशकुमार मेश्राम, जिल्हा नियोजन अधिकारी सोनकुसरे, सर्व तहसिलदार, खंडविकास अधिकारी व इतर विभाग प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)