शहरात पॉलिथीनबंदीचा फज्जा
By Admin | Updated: June 26, 2015 01:00 IST2015-06-26T01:00:44+5:302015-06-26T01:00:44+5:30
पॉलिथीन वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली नाही. त्यासाठी पथक नेण्याचेही ठरले होते.

शहरात पॉलिथीनबंदीचा फज्जा
भंडारा : पॉलिथीन वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली नाही. त्यासाठी पथक नेण्याचेही ठरले होते. तेही नेमण्यात आले नाही. नंतर त्याकडे कर्मचारी व नगरसेवकांनी लक्षही दिले नाही. सोयीस्करपणे सर्वांनी दुर्लक्ष केल्यामुळे योजना कागदोपत्री राहिली.
पॉलिथीनचा कचरा शहरात मोठ्या प्रमाणात निघतो. मेडिकलपासून ते भाजीपाला घेण्यासाठी सर्रास कॅरिबॅग वापरली जाते. यूझ अॅण्ड थ्रो एवढाच उपयोग असल्यामुळे या कचऱ्याचे प्रमाण कमी होण्याची सुतराम शक्यता नाही. शिवाय तो नष्ट होण्यासाठी १०० वर्ष लागतात.
या कॅरिबॅग शहरातील नाल्यात जाऊन बसत असल्यामुळे नाल्या तुंबू लागल्या. नाल्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने आरोग्याचे प्रश्न उद्भवत होते. त्यासाठी नगरपालिकेने पॉलिथीन वापरावर चाप लावण्याचा प्रयत्न केला. स्थानिक प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने व्यापारी, विक्रेते, नगरसेवक, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची बैठकही घेतली. त्यात पॉलिथीन वारावर बंदी घातली. वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या निर्णयाची अंमलबजावणी महिनाभरही झाली नाही. सरसकट लोकांनी कॅरिबॅग वापरण्यास सुरुवात केली. अल्पावधीत शहरात जैसे थे परिस्थिती झाली.
व्यापाऱ्यांनी कॅरिबॅगमध्ये साहित्य देण्यास सुरुवात केल्यामुळे विक्रेते, हातगाडे, भाजीपाला विक्रेत्यांनी अनुकरण केले. त्यामुळे कॅरिबॅगचा कचरा कमी झाला नाही. आता त्यात भरच पडत असल्यामुळे शहरात घाण वाढत आहे.
विशेष म्हणजे अनेक ठिकाणी शिळे अन्न अशा पॉलिथिन पिशव्यातून टाकले जाते हे अन्न खाण्यासाठी जनावरे या पिशव्या फाडतात. मात्र तरीही काही भाग पोटात गेल्याने आजार जडत आहेत. (प्रतिनिधी)