विदर्भासाठी चळवळीचे राजकीय रुपांतर आवश्यक
By Admin | Updated: August 29, 2016 00:19 IST2016-08-29T00:19:46+5:302016-08-29T00:19:46+5:30
वेगळ्या विदर्भासाठी काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सहकार्य मिळत नाही.

विदर्भासाठी चळवळीचे राजकीय रुपांतर आवश्यक
श्रीहरी अणे यांची पत्रपरिषद : विदर्भवाद्यांची उपस्थिती
भंडारा : वेगळ्या विदर्भासाठी काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सहकार्य मिळत नाही. यामुळे विदर्भाच्या चळवळीचे राजकीय रुपांतर झाल्याशिवाय वेगळा विदर्भ मिळणार नाही. परिणामत: विदर्भाच्या मुद्यावर निवडणूक लढण्यासाठी राजकीय पक्ष स्थापन करण्यासाठी विचारविमर्श करण्यासाठी सध्या विदर्भातील ११ जिल्ह्यात मोहिम सुरु असल्याची माहिती विदर्भवादी नेते तथा राज्याचे माजी महाअधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे यांनी आज स्थानिक विश्रामगृहात घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली.
अॅड. अणे म्हणाले, विदर्भाच्या मागणीसाठी राजकीय पाठबळ असणे आवश्यक आहे. विदर्भाच्या मुद्यावर आजपर्यंत भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी राजकारण केले. आता मात्र तेच विदर्भासाठी सहकार्य करीत नाही, याची खंत वाटते. यामुळे विदर्भाच्या चळवळीचे राजकीय रुपांतर केल्याशिवाय विदर्भ मिळणार नाही. यासाठी आपण विदर्भाच्या मुद्यावर राजकीय पक्ष निर्माण करुन निवडणूक लढवून केंद्र शासनावर दबाव आणण्यासाठी विदर्भातील ११ जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांशी विचारविमर्श करीत आहोत. येणाऱ्या स्थानिक निवडणूकापासून ते लोकसभेची निवडणूक विदर्भाच्या बॅनरखाली लढण्यासाठी विदर्भवादी नेत्यांची मते जाणून घेत आहोत. यानंतर निर्णय घेणार असल्याचे, ते म्हणाले. विदर्भवादी नेते जांबूतराव थोटे यांनी स्वत:ची चळवळ निर्माण केली. नंतर आलेल्यांनी विदर्भाच्या नावावर स्वत:ची पोळी शेकण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही त्यांनी केला. राजकीय चळवळीशिवाय वेगळा विदर्भ मिळू शकणार नाही. राजकीय चळवळीमुळेच तेलंगणाला स्वतंत्र मिळाले. अण्णा हजारे यांच्या चळवळीमुळे दिल्लीत केजरीवाल यांना सत्ता स्थापन करता आली, असेही ते म्हणाले. नितेश राणे यांचे विदर्भवादी नेतयावर केलेल्या आरोपावरुन राजकारणाचा दर्जा दिसून येते. काँग्रेसनेच त्यांच्या निलंबनाचा ठराव घेतला आहे. अनेक ठिकाणी नितेश राणेच्या विरोधात आंदोलन केली. त्याचा पुतळा जाळला.
मी सुध्दा पश्चिम महाराष्ट्र व मुंबई येथे विदर्भावर बोलतो. नितेश राणे सारख्या व्यक्तीला आम्हाला जास्त महत्व द्यायचा नाही. विदर्भातील ११ बार असोसिएशनने विदर्भाचा ठराव पारित केला. सर्व वर्तमानपत्रांचा विदर्भाच्या मागणीला पाठिंबा आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भासाठी सहकार्य करतील, अशी आशा आहे. परंतु त्यांची योग्य वेळ कोणती हेच कळत नाही. त्यांनी दिल्लीवर दबाव आणने आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह जोपर्यंत म्हणत नाही, तोपर्यंत विदर्भ मिळणार नाही असेही अॅड. अणे म्हणाले.
विदर्भाची चळवळ मुंबईहून चालविणे शक्य नाही. चळवळीसाठी पैसा लागतो. त्यामुळे मुंबईत राहावे लागते, असेही ते म्हणाले. यावेळी अॅड. सुरेंद्र पारधी, अनिल जवादे, नरेंद्र पालांदूरकर, अॅड. पदमाकर टेंभुर्णीकर,रमाकांत पशिने, प्रा. वडेटवार, अविनाश पनके, केशव हुड, माधव तिरपुडे, अॅड. जयेश बोरकर, अॅड. सनिष ठवकर, देवदास गभणे, संजय निनावे, मार्र्कंड नंदेश्वर, प्रगती ढवळे, कोमल पडोळे, प्रतिक्षा भोवते, प्रणाली कटकवार, मधुबाला पशिने, अॅड. प्रमोद काटेखाये, अॅड. विजय रेहपाडे उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)