राजकीय पक्षांनी मतांचे राजकारण केले
By Admin | Updated: August 30, 2016 00:17 IST2016-08-30T00:17:22+5:302016-08-30T00:17:22+5:30
संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी नागपुर करारानुसार विदर्भवासीयांना सहा आश्वासने देण्यात आली होती.

राजकीय पक्षांनी मतांचे राजकारण केले
साकोलीत जाहीर सभा : श्रीहरी अणे यांचे प्रतिपादन
साकोली : संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी नागपुर करारानुसार विदर्भवासीयांना सहा आश्वासने देण्यात आली होती. त्यापैकी तीन आश्वासने महाराष्ट्र सरकारने पाळली असली तरी लोकहिताच्या प्रमुख तीन आश्वासने पाळू शकली नाही. विदर्भातून गठ्ठा मते घेऊन गेलेले विविध राजकीय पक्षांनी फक्त मतांचे राजकारण केले. कधी जातीच्या नावावर तर कधी धर्माच्या नावावर भुलथापा देऊन राजकारण झाले. या विदर्भात सर्वच जाती धर्माची लोक एकत्रित राहतात. हिंदु-मुस्लिम दंगलीची एकही घटना घडली नाही. व भविष्यात घडणार नाही ही विदर्भवासीयांची ताकद आहे, असे प्रतिपादन माजी महाअधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे यांनी केले.
लहरीबाबा मठ देवस्थान परिसर साकोली येथे वेगळ्या विदर्भासाठी आयोजित जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते, अनील जवादे, निरंजन खांदेवाले, सुरेद्र पारधी, नरेंद्र पालांदूरकर, बंडू धोतरे, छौलबिहारी अग्रवाल, डॉ. गोविंद कोंडवाने, गुरुमत सिंह चावला, कमलेश भजनकर, उर्मिला आगाशे, तालुका अध्यक्ष प्रविण भांडारकर उपस्थित होते.
यावेळी अॅड. अणे म्हणाले, विदर्भाच्या मागणीसाठी राजकीय पाठबळ असणे आवश्यक आहे. यापुर्वी वेगळ्या विदर्भासाठी विविध राजकीय पक्षांनी आंदोलने केली, राजकारण केले. मात्र ऐनवेळीच या राजकीय पक्षांनी वेगळ्या विदर्भासाठी काढता पाय घेतला. यापुर्वी विदर्भासाठी आंदोलन झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मिती वेळेस नागपुर करारानुसार विदर्भवासीयांना शासकीय निमशासकीय शाळामहाविद्यालय व कार्यालयात २३ टक्के आरक्षण देण्याचा नियम असतांना या नियमाचे उल्लंघन होत आहे. हा विदर्भवासीयांवर एकप्रकारचा अन्याय आहे. त्यामुळे आता वेगळा विदर्भ होणे काळाची गरज आहे. त्याशिवाय विदर्भाचा विकास होऊच शकत नाही. असे साक्ष विदर्भवासीयांनी आता एकत्र येवून ताकद दाखविण्याची गरज असल्याचे सांगितले. सभेच्या पूर्वी वेगळ्या विदर्भासाठी रॅली काढण्यात आली. संचालन राकेश भास्कर यांनी केले. या कार्यक्रमाला शब्बीरभाई पठाण, दिपक जांभुळकर, बाळू गिऱ्हेपुंजे, मनोज कटकवार, यशपाल कऱ्हाडे, विनोद भुते यांच्यासह मोठ्यासंख्येने लोक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
वेगळ्या विदर्भाला तालुका अधिवक्ता संघाचा पाठिंबा
साकोली तालुका अभिवक्ता संघाने पृथक विदर्भ राज्याच्या आंदोलनाला समंती दर्शविलेली असून तसा ठराव जिल्हाधिकारी यांना पाठविलेला आहे. त्यामुळे विदर्भ राज्याच्या मागणीसाठी साकोली अधिवक्ता संघाचा पाठिंबा अॅड. अणेना साकोलीच्या जाहिरसभेत दर्शविण्यात आला. यावेळी अॅड. बापूसाहेब अवथरे, अॅड.अण्णा परशुरामकर, अॅड.सुरेश पाटील, अॅड टी. जे. गिऱ्हेपुंजे, अॅड. अशोक करवडे, अॅड. भार्गेश्वर भुरले, अॅड. एम. एम. गणवीर, अॅड. बी. संग्रामे उपस्थित होते.