परिसीमनानंतर बदलली राजकीय समीकरणे
By Admin | Updated: September 13, 2014 01:05 IST2014-09-13T01:05:35+5:302014-09-13T01:05:35+5:30
मागील निवडणुकीत उमेदवारी मिळाली ज्यांना उमेदवारी मिळालेली नव्हती त्यांनी यावेळी चांगलीच कंबर कसलेली आहे.

परिसीमनानंतर बदलली राजकीय समीकरणे
भंडारा : मागील निवडणुकीत उमेदवारी मिळाली ज्यांना उमेदवारी मिळालेली नव्हती त्यांनी यावेळी चांगलीच कंबर कसलेली आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी सर्वच पक्षात रस्सीखेच सुरू आहे. प्रत्येकच दावेदार नशिब आजमाविण्यासाठी प्रयत्नशील आहे. ही सर्व घडामोड परिसीमनानंतर बदलली.
सात तालुक्याच्या भंडारा जिल्ह्यात तुमसर, भंडारा, अड्याळ, साकोली आणि लाखांदूर असे पाच विधानसभा क्षेत्र होते. परिसीमनानंतर अड्याळ आणि लाखांदूर हे दोन क्षेत्र गोठवून तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन विधानसभा क्षेत्रात पाच विधानसभा क्षेत्र समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे दोन आमदार कमी झाले. परिणामी जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात झपाट्याने एकाचवेळी बदल घडून आला. मतदारांचीही तीन विधानसभा क्षेत्रात विभागण्यात आले.
परिसीमनानंतर विधानसभेची पहिली निवडणूक सन २००९ मध्ये झाली. त्यावेळी लोकसभा क्षेत्र भाजपाकडे होता. लोकसभा क्षेत्रावर भाजपचा कब्जा होता. असे असताना २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने खेचून आणल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे वारे सुरू होते.
२००९ च्या परिसीमनानंतर लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळी काँग्रेस-राकाँ आघाडी आणि भाजपा-शिवसेना युतीमध्ये लढत झाली होती. तुमसर आणि साकोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी लढत झाली होती. भंडारा क्षेत्रात शिवसेना विरुद्ध राकाँ असा मुकाबला रंगला. यात तुमसरात काँग्रेसचे अनिल बावनकर, भंडाऱ्यात शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर तर साकोलीत भाजपाचे नाना पटोले यांनी बाजी मारली होती.
आचारसंहिता घोषित होण्याची सर्वच राजकीय पक्ष वाट बघत होता. आज शुक्रवारला आचारसंहिता घोषित झाली तरी अद्यापही आघाडी आणि युतीतील चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे. त्यामुळे उमेदवारी अद्याप घोषित झालेली नाही. उमेदवारी मिळविण्यासाठी प्रत्येकच दावेदार जोमाने तयारीला भिडलेला आहे. प्रयत्नांती परमेश्वर असे म्हणत दावेदारांचे पराकोटीचे प्रयत्न सुरू आहेत. आता उमेदवारी कुणाला मिळते, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)