भंडारा : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांना घरातच थांबा असा दम भरणाऱ्या पोलिसांना मात्र घराबाहेर निघून रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय नाही. जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढत असताना पोलिसांच्या कुटुंबीयांच्या चिंतेत वाढ होत आहे. मात्र, जनतेच्या सुरक्षेसाठी त्यांना आपल्या जीवाची बाजी लावावीच लागते.
भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत ३३४ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी २१४ पोलिसांनी कोरोनावर यशस्वी मात केली, तर ११७ पोलीस ॲक्टिव्ह कोरोनाबाधित असून, त्यापैकी ४ पोलीस कर्मचारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. जिल्ह्यातील ३४ अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी २७ जणांनी कोरोनावर मात केली, तर ७ अधिकारी होम क्वारंटाइन आहेत. जिल्ह्यात पहिल्या लाटेत ५ पोलिसांचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या लाटेत सुदैवाने कुणाचाही मृत्यू झाला नाही.
जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारत यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील पोलिसांसाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. पहिला डोज घेणारे ९२.८६ टक्के अधिकारी कर्मचारी आहेत, तर दुसरा डोज ८२ टक्के अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. उर्वरित कर्मचारी अधिकारी विविध कारणांनी लस घेऊ शकले नाही, तेही लवकरच लस घेणार आहेत. सर्वत्र कोरोनाची लाट आली असून, दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. पोलिसांच्या कुटुंबीयांना चिंता सतावत असते. बाहेर गेलेला घरातील व्यक्ती पाॅझिटिव्ह तर येणार नाही ना, अशी शंका कायम मनात असते. मात्र, सर्वजण कोरोना नियमांचे पालन करतात.
बाबा भंडाराचे ठाणेदार आहेत. त्यांना काहीही झाले तरी घराबाहेर निघावेच लागते. आम्हाला काळजी असते, परंतु बाबा बाहेर असताना समाजासह स्वत:ची पूर्णत: काळजी घेतात. नागरिकांनी घराबाहेर न निघता, पोलिसांना सहकार्य करावे.
-हर्ष लोकेश कानसे, भंडारा
कोरोनाच्या काळात बाबा ड्युटी सोडू शकत नाही. मात्र, ते सर्व काळजी घेऊनच बाहेर निघतात. घरी आल्यावर आंघोळ करतात. सॅनिटायझरचा वापर करतात. विशेष म्हणजे ड्युटी संपल्यानंतर ते थेट घरी येतात. काळजी असली, तरी चिंता नाही.
-आकाश अर्जुन जांगळे, भंडारा
कोरोना काळात आमचे बाबा साकोली ठाण्यात ड्युटी करतात, परंतु ते सर्व नियमांचे पालन करतात. आपल्यासोबत दुसऱ्यालाही कोरोना होऊ नये, म्हणून ते अहोरात्र सेवा देत आहेत. स्वत:सोबतच ते समाजाची आणि आमचीही काळजी घेतात. त्यामुळे भीती नाही.
-मोहीत संजय पाटील, साकोली