फसवणूक करणाऱ्या सावकाराला पोलिसांचे अभय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2016 00:42 IST2016-02-06T00:42:16+5:302016-02-06T00:42:16+5:30
शासन दरबारी कर्जमाफीचे प्रस्ताव न पाठविता उलट शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्याकडून व्याजावर व्याज घेणाऱ्या सावकारांविरोधात शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार केली.

फसवणूक करणाऱ्या सावकाराला पोलिसांचे अभय
तुमसर : शासन दरबारी कर्जमाफीचे प्रस्ताव न पाठविता उलट शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्याकडून व्याजावर व्याज घेणाऱ्या सावकारांविरोधात शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार केली. मात्र अजूनपर्यंत सावकाराविरोधात गुन्हे दाखल झाले नाही की त्याची साधी विचारपूसही करण्यात आली नाही. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना न्यायासाठी जायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
विनोद पटले (४०) रा.येरली या शेतकऱ्याकडे सामलाटमध्ये ७ एकर शेती आहे. शेतीच्या कामाकरिता पैशाची गरज भासल्याने त्यांनी १७ नोव्हेंबर २०१४ रोजी तुमसर येथील सावकार सुनिल नारायण बडवाईक यांच्याकडे १,३३० ग्रॅम वजनाची सोन्याचे एक साखळी गहाण ठेवून त्यावर २० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.
दरम्यान सावकाराकडून ते गहाण ठेवलेली साखळी सोडविणे विनोद पटले यांना शक्य झाले नाही. त्यानंतर शासनाने, सन २०१४ मध्ये शेतकऱ्यांनी सावकाराकडून घेतलेले कर्ज माफ केले. तसेच कर्जमाफीचे प्रस्ताव सावकारांनी पाठवावे असेही निर्देश दिल्या गेले. सुनिल बडवाईक या सावकाराने मोठ्या शिताफिनी १७ नोव्हेबर २०१४ ला गहान ठेवलेल्या व न सोडविलेली साखळी परत ३० मे २०१५ ला गहान ठेवल्याची पावती शेतकऱ्याच्या हातात दिली. नवीन व्याज आकारणी करून पैसे घेणार असल्याचे पुढे येताच आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्याला कळले. (शहर प्रतिनिधी)
सदर प्रकाराची तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार चौकशी सुरु आहे. अर्जदाराला सावकाराने दिलेल्या पावतीचा नोंद ए.आर. आॅफीसला आहे. आणखीही शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त होत असून चौकशीअंती योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.
-किशोर गवई
पोलीस निरीक्षक, तुमसर.