तंटामुक्त मोहिमेला पोलिसांचेच असहकार्य
By Admin | Updated: November 24, 2014 22:53 IST2014-11-24T22:53:15+5:302014-11-24T22:53:15+5:30
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेने गावखेड्यांना शांततेतून समृध्दीकडे जाण्याची नवी वाट दाखविली आहे. पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने ग्रामस्थांना त्या वाटेवरुन मार्गक्रमण करावयाचे आहे.

तंटामुक्त मोहिमेला पोलिसांचेच असहकार्य
भंडारा : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेने गावखेड्यांना शांततेतून समृध्दीकडे जाण्याची नवी वाट दाखविली आहे. पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने ग्रामस्थांना त्या वाटेवरुन मार्गक्रमण करावयाचे आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत पोलिसांची महत्वाची भूमिका असली तरी पोलिस प्रशासन मात्र फारसी सहकार्याची भावना ठेवत नसल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.
एखादा तंटा सोडविण्यासाठी तंटामुक्त गाव समितीसमोर आला तर तंटामुक्त समितीला विचारपूर्वक आणि सदसद्विवेकबुध्दीला स्मरुन निर्णय घ्यावा लागतो. कधी कधी दोन्ही पक्षांना मान्य होईल, अशी समाधानकारक तडजोड समितीला करावी लागते. जनतेला पोलिस ठाणे, न्यायालयाच्या वाटा मोकळ्या असल्या तरी पैसा व वेळेची नासाडी आणि मानसिक त्रास कुणालाच नको असतो.
तंटामुक्त समिती समित्यांना प्रोत्साहन तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यात पोलिस प्रशासनाची महत्वाची भूमिका आहे. मात्र काही अपवाद वगळले तर पोलीस वर्तुळात तंटामुक्तीविषयी निरुत्साह असल्याचे बहुतांश अध्यक्ष सांगतात. लाखो लोकसंख्या असलेल्या जिल्हयाची कायदा आणि सुव्यवस्था राबविण्याची जबाबदारी पोलीस कर्मचाऱ्यांवर आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था सांभाळताना पोलिस यंत्रणेवर प्रचंड ताण पडतो. तंटामुक्ती गाव समितीची अंमलबजावणीचे काम स्थानिक पातळीवर पोलिस स्टेशनमधील गोपनीय शाखेच्या एक किंवा दोन कर्मचाऱ्यांकडे देण्यात येते. इतर कामाबरोबरच तंटामुक्तीचे अतिरिक्त काम कर्मचारी करीत असले तरी प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्याची आवश्यकता आहे. कायद्याच्या ज्ञानाबरोबरच सामाजिक सुसंवादाचे ज्ञान असलेल्या कर्मचाऱ्याकडे तंटामुक्तीची जबाबदारी सोपविण्यास तंटामुक्तीचे काम अधिक प्रभावी होऊ शकते. काळाची महिमा म्हणा अगर आधुनिक पहाटेच्या उजेडासोबतच गावचे गावपण हरवत चालले आहे. काही वर्षापूर्वी सगळे गाव शेजारच्या घरातील दु:खाचा आलेखही शेजारच्या चेहऱ्यावर उमटत नाही. त्यामुळे सत्ता, राजकारण जातीयवादामुळ विस्कटलेली गावाची घडी नीट बसविण्यासाठी शासनाने तंटामुक्त गाव अभियान हाती घेतले आहे. त्यामुळेच हे अभियान एक मोहीम न राहता तंटामुक्ती वास्तवात उतरल्यास महात्मा गांधीच्या स्वप्नातला भारत साकार होण्यास वेळ लागणार नाही. (नगर प्रतिनिधी)