अपघात प्रकरणात पोलिसांची दिरंगाई
By Admin | Updated: March 2, 2016 01:19 IST2016-03-02T01:19:15+5:302016-03-02T01:19:15+5:30
एम.आय.डी.सी. जवळ झालेल्या अपघातात मोहाडी पोलिसांनी केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच अपघात करणाऱ्या वाहनाचा शोध लागलेला नसून पुढे शोध लागेल...

अपघात प्रकरणात पोलिसांची दिरंगाई
पत्रपरिषदेत जनतेचा आरोप : प्रकरण मोहाडीजवळील अपघाताचे
मोहाडी : एम.आय.डी.सी. जवळ झालेल्या अपघातात मोहाडी पोलिसांनी केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच अपघात करणाऱ्या वाहनाचा शोध लागलेला नसून पुढे शोध लागेल की नाही असा आरोप पत्रपरिषदेत जनतेने केला आहे.
१७ फेब्रुवारीला रात्री ११ ते ११.३० वाजेदरम्यान एम.आय.डी.सी. जवळील पेट्रोलपंपासमोर विश्वास मदन निमजे (२९) याच्या सायकलला मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात विश्वास निमजे याच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली. गंभीर अवस्थेत त्याला नागपुरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान १८ फेब्रुवारीला सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. अपघात घडल्यावर ग्रामीण रुग्णालय मोहाडीचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.हंसराज हेडाऊ यांनी दूरध्वनीवरून अपघाताची माहिती मोहाडी पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र स्टेशन डायरीवर असलेल्या पोलिसाने या घटनेला गांभीर्याने घेतले नाही आणि तशी नोंद सुद्धा केली नाही. त्यामुळे अपघात करणारे वाहन पळून जाण्यात यशस्वी झाले. १७ फेब्रुवारीला रात्री कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपायाने सूचना देऊनही नोंद केली नाही व तब्बल दोन दिवसानंतर रिपोर्ट दाखल करण्यात आल्या प्रकरणी त्या शिपायाला निलंबित करण्यात यावे, शांती ब्राईट बार इंडस्ट्री, एम.आय.डी.सी. मोहाडी येथे शिफ्ट संपल्यावर सायरन वाजवला जात नाही. त्यामुळे या कंपनीवर कारवाई करण्यात यावी. कारण सायरनच्या आवाजाने वाहनांना शिफ्ट संपली असून कामगार बाहेर रस्त्यावर येतील याची माहिती मिळते व अपघात टळू शकते. एम.आय.डी.सी. ते बसस्टॉप मोहाडीपर्यंत वाहनांची वर्दळ राहत असल्याने या भागात पथदिव्यांची व्यवस्था करण्यात यावी. मोहाडी बसस्टॉप चौक येथे सिसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, या रस्त्यावर वनोपज नाका लावण्यात यावा, मोहाडीत बाहेरून आलेल्या लोाकंची नोंद पोलिसांनी करून द्यावी, मृतकाच्या कुटुंबीयाला शासनाने आर्थिक मदत द्यावी आदी मागणी पत्रपरिषदेला नगरसेवक सायत्रा पारधी, नगरसेवक रविकांत देशमुख, नगरसेवक सेवक चिंधालोरे, ग्रा.रु. समिती सदस्य अजय गायधने, सामाजिक कार्यकर्ते सुभाष भाजीपाले, मनीष पराते, नारायण निखारे, विशाल निखारे, धीरज रायकवाड, अजय निनावे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)