विद्यार्थ्यांनी केली प्राचार्याच्या विरोधात पोलीस तक्रार
By Admin | Updated: October 27, 2016 00:32 IST2016-10-27T00:32:08+5:302016-10-27T00:32:08+5:30
विद्यापीठ शुल्काच्या व्यतिरिक्त जास्त पैसे मागितले जात आहे, अशा प्रकारची तक्रार समर्थ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केली.

विद्यार्थ्यांनी केली प्राचार्याच्या विरोधात पोलीस तक्रार
लाखनी : विद्यापीठ शुल्काच्या व्यतिरिक्त जास्त पैसे मागितले जात आहे, अशा प्रकारची तक्रार समर्थ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केली. याप्रकरणी पोलीस प्रशासन काय कारवाई करतात, याकडे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष आहे.
ग्रामीण भागात उच्च शिक्षण घेता यावे, या उदात्त हेतूने १९६५ साली समर्थ महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. २००५ पर्यंत या महाविद्यालयाचा हेतू निस्वार्थ होता. संघ विचाराचे माहेरघर म्हणून महाविद्यालयाची प्रचिती होती.
संघ विचाराने चालणाऱ्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांची लूट होत आहे. परंतु आज या महाविद्यालयाला जणू ग्रहण लागले की काय असे प्रकार उघडकीस येत आहे. समर्थ महाविद्यालय लाखनी येथील प्राचार्य संजय पोहरकर यांना संस्थेने निलंबित केले. त्यानंतर लाखनी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुध्द भादंवि ४०८, ४०९, ४२०, ४६८, ४७१ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु आज समर्थ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनकडे धाव घेतली व प्राचार्याच्या विरोधात विद्यापीठ शुल्काच्या व्यतिरिक्त जास्त पैसे मागितले जात आहे, अशा प्रकारची तक्रार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केली.
विद्यापीठातंर्गत नियमित प्रवेश शुल्क लाल किंवा पिवळ्या रंगाची पावती आहे.
परंतु नियमबाह्य शुल्क घेण्यासाठी पांढऱ्या रंगाची पावतीचा वापर प्राचार्यांमार्फत केला जातो. २००५ नंतर संजय पोहरकर प्राचार्य झाल्यानंतर अशा प्रकारच्या पावत्याचा वापर केला जात आहे.
महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांनी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची भेट घेवून अशा प्रकारच्या शुल्क बद्दल विचारणा केली असता, त्यांनी या शुल्कबद्दल नियमबाह्य आहे असे सांगितले. त्यांच्या माहितीनुसार विद्यार्थ्यांनी काल,मंगळवार रोजी लाखनी पोलीस स्टेशनला लेखी तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलीस प्रशासन काय कारवाई करतात, याकडे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष आहे. (शहर प्रतिनिधी)