पोलीस वसाहत झुडपी जंगलाच्या गर्तेत
By Admin | Updated: December 18, 2014 00:33 IST2014-12-18T00:33:30+5:302014-12-18T00:33:30+5:30
पोलीस ठाणे मोहाडीच्या मागील भागात झुडपी जंगल व कचरा वाढल्याने तिथे लपून बसलेले विषारी साप सरळ पोलीस..

पोलीस वसाहत झुडपी जंगलाच्या गर्तेत
सिराज शेख मोहाडी
पोलीस ठाणे मोहाडीच्या मागील भागात झुडपी जंगल व कचरा वाढल्याने तिथे लपून बसलेले विषारी साप सरळ पोलीस ठाण्याच्या आवारात दिसून आले आहेत. त्यामुळे येथे काम करणारे कर्मचारी व तक्रार करण्यास आलेले नागरिक भयग्रस्त झाले आहेत. याला मुख्यत्वे पोलीस वसाहतीची दुर्दशा कारणीभूत आहे.
पोलिसांच्या उत्थानासाठी सरकार नेहमी मोठमोठ्या घोषणा करीत असते. मात्र परिस्थिती या विपरीत आहे. राज्य शासनाच्या इतर विभागापेक्षा पोलीस विभागावर शासनाचे नेहमी दुर्लक्ष असते. इतर विभागातील शासकीय कर्मचारी आपल्या संघटनेमार्फत शासनावर दबाव आणून आपल्या मागण्या मान्य करण्यास बाध्य करू शकते. मात्र पोलीस कर्मचाऱ्यांची संघटनाच नसल्याने त्यांना कोणीच वाली नाही.
२४ तास आॅनड्युटी असणारे पोलीस मात्र शासकीय आवासापासून वंचित आहेत. मोहाडी पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूला लागूनच पोलीस वसाहत तयार करण्यात आली होती. मात्र देखभाल दुरुस्तीच्या अभावामुळे या वसाहतीची दुर्दशा झाली. या वसाहतीतील मोडकळीस आलेल्या घरात कोणीच पोलीस कर्मचारी राहत नसल्याने या ठिकाणी मोठमोठे गवत, कचरा, झुडपी जंगले तयार झालीत. झाडीझुडपी इतकी घनदाट आहेत की या ठिकाणी जर एखादा व्यक्ती लपून उभा राहिला तरी तो दिसणार नाही. वसाहतीतील घरात माती, दगड, केरकचरा असल्याने येथे सापांचा वावर वाढला आहे. या ठिकाणी दिवसाही कोणी जात नसल्याने सापासाठी ही जागा वरदान ठरली आहे. मात्र कधी कधी हेच विषारी साप भटकत भटकत पोलीस ठाण्यात येतात व मग एकच धावपळ सुरु होते असे चित्र अनेक वेळा पहायला मिळाले आहे.
पोलीस वसाहतीसाठी मोहाडी - भंडारा राज्य मार्गावर एक ते दीड एकर जागा अनेक वर्षापूर्वी घेण्यात आली होती. ही जागा पोलीस स्टेशन मोहाडीच्या अगदी जवळच आहे. मात्र अजूनपर्यंत या जागेवरही पोलिसांचे घरे बांधण्यात आले नाही. विशेष म्हणजे या जागेवर काही दिवसापर्यंत पोलीस वसाहतीची जागा असे लिहिलेले फलक दिसत होते. तेही फलक आता दिसेनासे झाले आहे. या जागेबाबत मोहाडी पोलीस ठाण्यात पूर्ण माहिती उपलब्ध नाही.
या जागेचे कागदपत्रे जिल्हा मुख्यालयात असल्याचे सांगण्यात येते. पोलिसांना वेळी अवेळी कर्तव्य बजावण्यासाठी त्यांचे पोलीस ठाण्याजवळ राहणे आवश्यक असते. यासाठी पोलीस वसाहत उपयुक्त ठरते. मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे पोलिसांना हक्काच्या घरापासून वंचित राहावे लागत आहे. मोहाडी पोलीस वसाहतीची दुर्दशा त्याचे जिवंत उदाहरण होय.