विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांचा लाठीमार
By Admin | Updated: September 30, 2015 00:46 IST2015-09-30T00:46:05+5:302015-09-30T00:46:05+5:30
शहरातील बजरंग गणेशोत्सव मंडळाने काढलेल्या विसर्जन मिरवणुकीवर शहर पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना सोमवारी रात्री घडली.

विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांचा लाठीमार
भंडारा बंदचे आवाहन : दोषी पोलिसांविरुद्ध कारवाईची मंडळाची मागणी, पाठीवर व्रण येईस्तोवर तरुणांना बदडले
भंडारा : शहरातील बजरंग गणेशोत्सव मंडळाने काढलेल्या विसर्जन मिरवणुकीवर शहर पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या घटनेच्या निषेधार्थ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारला दुपारी १ वाजता पोलीस ठाण्याला घेराव करुन दोषी पोलिसांविरुद्ध कारवाईची मागणी केली.
भंडारा बंदचा इशारा
तत्पूर्वी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषद घेऊन पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध केला. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी बुधवारला भंडारा शहर बंदचे आवाहन केले आहे. यावेळी ते म्हणाले, मंगळवारला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास बजरंग गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक ढोलताशाच्या गजरात निघाली. मिरवणूक महालाजवळ आल्यानंतर दरवर्षीप्रमाणे संकटमोचक मंदिरात हनुमंताच्या मूर्तीसमोर हनुमान चालिसाचे पठण सुरु असतानाच काही पोलिसांनी तरुणांना धमकविणे सुरु केले.
पोलिसांकडून बेदम मारहाण
काही कळायच्या आतच पोलिसांनी कार्यकर्त्यांना लाठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. हा लाठीमार का केला जात आहे, हे विचारण्यासाठी काही ज्येष्ठ कार्यकर्ते गेले असता त्यांच्यावरही लाठीमार करण्यात आला. कार्यकर्ते जिवाच्या आकांताने जात असताना पोलिसांनी त्यांना पकडून पकडून बदडले. या लाठीहल्ल्यात दश माटूरकर, हर्षल कुंभारे, चेतन पाटील, वैभव बांते, हरीष हुकरे, प्रणय कुथे, संकेत मते, शुभम माटूरकर, मिलिंद डुंभरे, बंटी अले, जय पटेल या तरुणांच्या पाठीवर लाठीचे बेदम व्रण आहेत. याशिवाय उषा सरसाळे, सुमन डुंभरे, आरजु करंडे, तुलसी पटेल या महिलांनाही पोलिसांनी बेदम मारहाण केली.
यावेळी गणवेशात नसलेल्या पोलिसांनी बँडपथकातील तरुणांनाही बदडून वाद्य हिसकावून घेतले. पोलीस एवढ्यावरच न थांबता घरात शिरुन मारहाण केली. पोलिसांनीच कार्यकर्त्यांना सूचना न देता गणपती मूर्तीचे विसर्जन केले. त्यामुळे ही पोलिसांची सुनियोजित प्रयत्न होता, असा आरोपही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. याप्रकरणी दोषी पोलिसांना निलंबित करुन न्याय देण्याची मागणी महिला व पुरुषांनी केली.
संघटनांनी नोंदविला निषेध
बजरंग गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमारच्या घटनेचा भंडारा जिल्हा विकास मंचचे जिल्हाध्यक्ष आबिद सिद्धीकी यांनी निषेध नोंदविला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
अनंत चतुर्दशीला विसर्जनाची गरज
राज्यात सर्वत्र अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन करण्याची पद्धत आहे. मात्र भंडारा या एकमेव जिल्ह्यात तिथी गेल्यानंतर पितृपक्षात विसर्जन करण्याचा पायंडा आहे. महानगराच्या तुलनेत या जिल्ह्यात सार्वजनिक गणपती कमी आहेत. असे असताना एकाच दिवशी विसर्जन पद्धत असती तर कदाचित ही वेळ आली नसती. त्यामुळे प्रशासनासह गणपती मंडळांनीही पुढच्या वर्षीपासून अनंत चतुर्दशीलाच विसर्जन करण्याची परंपरा जपली पाहिजे.