पोलीस व जनतेतील दुरावा कमी व्हावा!
By Admin | Updated: February 15, 2017 00:26 IST2017-02-15T00:26:40+5:302017-02-15T00:26:40+5:30
गुन्हेगारीच्या प्रमाणात पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेमुळे मोठी घट होत आहे. मात्र अन्याय झालेल्या व्यक्ती त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची तक्रार करण्यास धजावतात.

पोलीस व जनतेतील दुरावा कमी व्हावा!
रश्मी नांदेडकर : गणेशपूर येथे फिरत्या पोलीस ठाण्याचे उद्घाटन
भंडारा : गुन्हेगारीच्या प्रमाणात पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेमुळे मोठी घट होत आहे. मात्र अन्याय झालेल्या व्यक्ती त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची तक्रार करण्यास धजावतात. पोलिसांनी जनतेतील दुरावा कमी व्हावा यासाठी फिरत्या पोलीस ठाण्यांची संकल्पना राबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर यांनी व्यक्त केले.
गणेशपुर येथे फिरत्या पोलीस ठाण्याचे उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. गणेशपूर ग्रामपंचायतच्या आवारात फिरत्या पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नोंदडकर यांच्यासह सरपंच वनिता भुरे, उपसरपंच यशवंत सोनकुसरे, पं.स. सदस्य वर्षा साकुरे, तंमुस अध्यक्ष सॅमुवेल गजभिये, पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण, ग्रा. पं. सदस्य, पोलीस पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी नांदेडकर यांनी जनतेने कुणालाही न घाबरता त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची तक्रार पोलिसात दयावी असे प्रतिपादन केले. प्रास्ताविक यशवंत चव्हाण यांनी केले. यात त्यांनी तक्रारी असल्यास थेट पोलीस स्टेशनमध्ये नोंदवाव्या किंवा फिरत्या पथकाच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आलेल्या या अभिनव सुविधेचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन केले.
सरपंच वनिता भुरे यांनी गाव तिथे पोलीस स्टेशन योजना ग्रामस्थांसाठी फायद्याचे असून प्रत्येकांनी याचा लाभ घ्यावा व गावातील अवैध धंद्यावर आळा बसविण्यास सहकार्य करावे असे प्रतिपादन केले. संचालन तंमुस अध्यक्ष गजभिये यांनी केले तर आभार कौशल यांनी केले. कार्यक्रमाला ग्रा. पं. सदस्य धनराज मेहर, मनिष गणविर, किर्ती गणविर, दामिनी सळमते, सुभद्रा हेडाऊ, माधुरी देशकर, संध्या बोदेले, मधुमाला बावनउके, सुधा चवरे, पुष्पलता कारेमोरे, कृष्णा गोखले, शेखर खराबे, देवा कारेमोरे, सुभाष बोरकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)