रात्रीच सोडल्या गेली पोकलँड मशीन
By Admin | Updated: May 1, 2015 00:53 IST2015-05-01T00:53:38+5:302015-05-01T00:53:38+5:30
अवैध रेतीची वाहतुक करणारे ट्रॅक्टर सोडले नाही म्हणून तासभर करडी चौकीत...

रात्रीच सोडल्या गेली पोकलँड मशीन
करडी (पालोरा) : अवैध रेतीची वाहतुक करणारे ट्रॅक्टर सोडले नाही म्हणून तासभर करडी चौकीत ठिय्या मांडून बसलेल्या आ. चरण वाघमारे यांच्या निर्देशानुसार तहसिलदार मोहाडी व पोलिसांनी कान्हळगाव घाटातून पोकलँड मशीन मोठ्या तावात येवून ताब्यात घेतली. त्यावेळी घाटात उपसा करण्यासाठी पोकलँड मशीनची परवानगी आहे किंवा नाही याची सहनिशा न करता ४ ते ५ कि़मी. अंतरावरील करडी पोलीस चौकीत ती जमाही केली.
करडी पोलिसांनी मुंढरी रेतीघाटावरून अवैधपणे उपसा करून चोरटी वाहतूक करणारे खडकी व मुंढरी येथील दोन ट्रॅक्टर करडी पोलीस चौकीत ताब्यात घेवून जमा केले. कारवाई सुद्धा केली. भाजपाच्या एका मोठ्या नेत्याने ट्रॅक्टर सोडण्यासाठी दबाव निर्माण केला असताना ती सोडण्यात आली नव्हती. दोन्ही ट्रॅक्टर भाजपा कार्यकर्त्यांचे होते व ती सांगितल्यानंतरही सोडण्यात न आल्याने आमदार चरण वाघमारे यांनी सर्व कामे बाजुला सारीत मोहगाव वरून करडी पोलीस चौकीत धाव घेतली.
तासभर ठिय्या मांडून पोलीस व महसूल प्रशासनावर तासेरे ओढले. भुरट्या रेती चोरट्यांना तुम्ही पकडता, मग मोठ्यांना का पकडत नाहीत. त्याचेशी काही साटेलोटे तर नाही, असा प्रश्न उपस्थित करून भंडावून सोडले. अवैधपणे जेसीबी व पोकलँड मशीनने रेतीचा उपसा करणाऱ्या घाटांवर कारवाई झाली पाहिजे, असे निर्देश दिले. व वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली.
आमदार महोदयांच्या निर्देशानुसार मोहाडी तहसिलदार करडी चौकात धाडकन पोहचले. पोलिसांना घेवून कान्हळगाव रेतीघाटावर गेले. मोहाडी पोलिसांची चमू सुद्धा मदतीला बोलविण्यात आली. त्यावेळी तहसिलदार थोटे यांनी पोकलँड किंवा जेसीबीने रेतीचा उपसा करण्याची परवानगी नसल्याची माहिती माध्यमांनाच्या प्रतिनिधींना सुद्धा दिली.
कान्हळगाव घाटावरील ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांनी विरोध केला असताना मशीन रस्त्यावरून नेऊन चौकीत जमा करण्यात आली. प्रशासन घाटावरच परवानगी आहे किंवा नाही ते तपासून पाहू शकले असते, मात्र त्यांनी तसे केले नाही. दबावात कारवाई केली.
रात्री ८ ते ८.३० वाजताचे दरम्यान घाट ठेकेदारांनी पोकलँडने रेतीचा उपसा करण्याची परवानगी असलेले पत्र दाखविल्याचे कारण देत मशीन तहसिलदारांनी सोडली. (वार्ताहर)