पंतप्रधान सडक योजना कागदोपत्री
By Admin | Updated: April 5, 2015 00:53 IST2015-04-05T00:53:09+5:302015-04-05T00:53:09+5:30
मागील सहा महिन्यांपासून आमगाव ते मुंडीपार पुढे बंजारीटोला गावापर्यंत १२ किमी रस्ता दुरुस्ती करणाचे काम सुरू आहे.

पंतप्रधान सडक योजना कागदोपत्री
निधीचा अभाव : शंभुटोला मार्गावर खोदकामामुळे प्रवाशांना यातना
आमगाव : मागील सहा महिन्यांपासून आमगाव ते मुंडीपार पुढे बंजारीटोला गावापर्यंत १२ किमी रस्ता दुरुस्ती करणाचे काम सुरू आहे. माल्ही गावाजवळून शंभुटोला गावापर्यंत पूर्ण डांबरीकरणासाठी खोदकाम झाले. रस्त्यावर गिट्टी पडली आहे. ठिकठिकाणी पाईप टाकून बांधकाम सुरू आहे. मात्र या अर्धवट कामामुळे अनेक प्रवाशांना यातना सहन कराव्या लागत आहेत. त्याची जाणीव अधिकारी व कंत्राटदारांना नाही. निधीअभावी पंतप्रधान सडक योजना केवळ कागदावरच आहे. अधिकारी तोंडावर हात ठेवून बसले आहेत.
हा रस्ता जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. मात्र एवढा निधी मार्गाला उपलब्ध होऊ शकत नाही. काम लवकरात लवकर झाले पाहिजे याकरिता सदर १२ किमीचा रस्ता पंतप्रधान सडक योजनेत समाविष्ट करण्यात आला. या मार्गाच्या कामाकरिता नगरातील कामठा चौकात सर्वदलीय आंदोलन झाले. मार्गाकरिता निधीचा पहिला टप्पा आला. कंत्राटदाराने कामाला सुरुवात केली. तब्बल चार किमीचे डांबरीकरण काढून फेकले. पाच वर्षांपूर्वीचे डांबरीकरण निघाले, परंतु मार्गावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या गिट्टीमुळे सायकल, आॅटोरिक्षा, दुचाकी, चारचाकी वाहने चालविणे त्रासदायक ठरत आहे.
ठिकठिकाणी मार्गावर लहान पुलाचे पाईप टाकून काम सुरू असले तरी कामाची गती संथ आहे. रात्री प्रवास करताना प्रवाशांना किंवा दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना जीव धोक्यात टाकून वाहन काढावे लागत आहे. काम सुरू असलेल्या पुलावरची माती जडवाहनाने खचली तर वाहन खोदकाम झालेल्या खड्ड्यात जावून मोठी दुर्घटना झाल्याशिवाय राहणार नाही. जुने पाईप टाकलेल्या ठिकाणी मोठे खड्डे पाईपात पडले आहेत. अनोळखी प्रवासी या मार्गावरुन गाडी घेऊन निघाला तर गाडी घेऊन खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही. हे खड्डे तब्बल पाच वर्षांपासून आहेत. मात्र अधिकारी खड्डा बघत मौन बाळगून आहेत.
एकंदरित या मार्गावरुन प्रवास करणे तेवढे सोपे नाही. जीव धोक्यात टाकून प्रवाशांना प्रवास करावा लागतो. मार्गावरील पडलेले मोठमोठे खड्डे चुकविता येऊ शकत नाही. चुकविण्याचा प्रयत्न केला तर दुसरा खड्डा दत्तक म्हणून उभा असतो. खोदकामामुळे रस्त्यावर पडलेली गिट्टी, संथ गतीने सुरू असलेले नाली बांधकाम यामुळे प्रवाशांचे या मार्गावर प्रवास करतेवेळी जीव गुदमरुन गेल्याशिवाय राहत नाही. शाळकरी मुले, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी याची ये-जा मोठ्या प्रमाणात या मार्गावर आहे.
त्रास होतो म्हणून अनेक प्रवाशी माल्ही गावातून शंभुटोला या मार्गावरुन फेरा मारुन प्रवास करीत आहेत. निधीचा दुसरा हप्ता उपलब्ध झाला नाही. कंत्राटदाराने निधी नसल्याचे सांगून काम कासवगतीने सुरू केले आहे. आता दोन महिन्यानंतर पावसाळा सुरू होणार नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी १२ किमीच्या रस्त्याचे डांबरीकरण करून प्रवाशांच्या यातना कमी करण्याचे प्रयत्न होतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)
अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था
आमगाव, शंभुटोला, महारीटोला, सरकारटोला, ननसरी, मुंडीपार, खैरीटोला पुढे बंजारीटोला असा १२ किलोमीटर अंतराचा रस्ता जवळपास आठ गावांना जोडणारा आहे. याच मार्गावरुन ननसरीवरुन बाघनदीच्या पात्रातून मध्य प्रदेशातील परसोडी, देऊळगाव व इतर गावातील नागरिक याच मार्गाने प्रवास करतात. उन्हाळ्यात बाघनदीच्या पात्रात पाणी राहत नाही. पात्र कोरडे असल्याने कमी वेळात प्रवास करणारे प्रवाशी येथून जाणे-येणे करतात. दुर्दैव म्हणजे या रस्त्याचे तब्बल पाच वर्षांपासून डांबरीकरण झाले नाही. जे डांबरीकरण झाले त्यात तीन ते चार फूट लांब खड्डे पडले. अनेक खड्ड्यांनी सदर रस्ता अपघाताचा मार्ग ठरला आहे.