वन कर्मचाऱ्यांची लूट
By Admin | Updated: October 18, 2014 01:07 IST2014-10-18T01:07:38+5:302014-10-18T01:07:38+5:30
नागझिरा व न्यु नागझिरा अभयारण्यातील पिटेझरी, उमरझरी या वनक्षेत्रात रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना शासनाने एकस्तर पदोन्नती दिली.

वन कर्मचाऱ्यांची लूट
भंडारा : नागझिरा व न्यु नागझिरा अभयारण्यातील पिटेझरी, उमरझरी या वनक्षेत्रात रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना शासनाने एकस्तर पदोन्नती दिली. या पदोन्नतीची राशी देण्यासाठी साकोली कोषागार कार्यालयाकडून वन कर्मचाऱ्यांकडे १० टक्के लाचेची मागणी करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आपले हक्काचे पैसे मिळविण्यासाठी या कर्मचाऱ्यांवर लाच देण्याची वेळ आली आहे.
नागझिरा, न्यू नागझिरा वन्यजीव अभयारण्य हे नक्षलग्रस्त म्हणून घोषीत आहे. या अभयारण्यात वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी याठिकाणी अनेक वन कर्मचारी तैनात असून ते आपले कर्तव्य चोखपणे बजावतात. हा भाग नक्षलग्रस्त असल्यामुळे राज्य शासनाने या वन कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नती दिली. यामुळे त्यांचा एरिअर्ससुद्धा देण्यात येणार आहे. परंतु, एरिअर्सची रक्कम देण्यासाठी साकोली येथील कोषागार कार्यालयातील कर्मचारी एकूण रकमेच्या १० टक्के लाच मागत असल्याचा आरोप वन कर्मचाऱ्यांनी केला आहे. याबाबत संबंधित वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी आपल्या वन कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन जे कर्मचारी पैसे देतील, त्यांचेच एरिअर्सचे पैसे काढू, असे कोषागार कर्मचाऱ्यांचे म्हणणे असल्याचे सांगितले. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांनी पैसे दिले, त्यांचेच बिल काढण्यात आले असून उर्वरित कर्मचारी एरिअर्सच्या निधीपासून वंचित आहेत. या प्रकारामुळे वन कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे. वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी जीवाचे रान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्याच हक्काचे पैसे मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी साकोली कोषागार कर्मचाऱ्यांना समज देऊन आमचे हक्काचे पैसे आम्हाला मिळवून द्यावे, अशी मागणी वन कर्मचाऱ्यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)