व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट
By Admin | Updated: October 25, 2015 00:29 IST2015-10-25T00:29:08+5:302015-10-25T00:29:08+5:30
दिवाळीसारखा सण १५ दिवसांवर येऊन ठेपला असताना धान खरेदी केंद्र सुरु न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट
दिवाळी अंधारात जाण्याची भीती : आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी
कोंढा (कोसरा) : दिवाळीसारखा सण १५ दिवसांवर येऊन ठेपला असताना धान खरेदी केंद्र सुरु न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी हलक्या प्रतीचे धान कापले असून ते मळणी करणे सुरु केले आहे. तेव्हा व्यापारी अत्यल्प भावात धान खरेदी करीत असल्याची ओरड शेतकरी करीत आहे.
शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र अजूनपर्यंत सुरु केले नाही. पवनी तालुक्यात आधारभूत धान खरेदी करण्यासाठी तालुका खरेदी विक्री सह संस्था यांना दरवर्षी अधिकार पत्र दिले जाते. मार्केटिंग अधिकारी यांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर १ नोव्हेंबर पूर्वी कोणतेच केंद्र सुरु होणार नाही अशी माहिती आहे. चौरास भागात कोंढा परिसरात सर्वाधिक धानाची लागवड शेतकरी करतात.
यावर्षी कोंढा परिसरात अत्यल्प पाऊस पडला. तसेच कमी पाऊस पडत असल्याने शेतकरी १०० दिवसाचे धान पिक घेत असतात. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान पिक निघाले आहे हलक्या प्रतीचे धानाची कापणी, मळणी सुरु आहे. तेव्हा त्याचा फायदा व्यापारी घेत आहे. मातीमोल किमतीत धान घेऊन शेतकऱ्यांची लूट करीत आहेत.
कोंढा परिसरात २० गावातील शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती यार्ड, कोंढा येथे नेहमी धान खरेदी केंद्र उघडले जाते ते सुरु होणे आवश्यक आहे. एक एकर शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना १५ ते २० हजार रुपयांचा खर्च येते. पण धानाच्या भावात वाढ झाली नाही. बारीक धान व्यापारी १३०० ते १४०० रुपये क्विंटलने घेत आहे. दरवर्षी उत्पादन खर्च वाढत आहे. पण धानाचे भाव वाढत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी शेतकऱ्याचे खोडकिडा व तुळतुळा तसेच व्हायरल रोगाने शेतकऱ्यांच्या धान पिकाचे प्रचंड नुकसान केले. शेती परवडत नाही असे शेतकरी बोलत आहे. अशातच धानाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. धान खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)