वडार, मांग गारुडी समाजाला जातीचे दाखले दया
By Admin | Updated: November 22, 2014 00:15 IST2014-11-22T00:15:36+5:302014-11-22T00:15:36+5:30
तालुक्यातील मौजा गिरोला येथील वडार समाजाला व कारधा येथील मांग गारुडी समाजाला तात्काळ जातीचे दाखले देण्यात यावे अन्यथा...

वडार, मांग गारुडी समाजाला जातीचे दाखले दया
भंडारा : तालुक्यातील मौजा गिरोला येथील वडार समाजाला व कारधा येथील मांग गारुडी समाजाला तात्काळ जातीचे दाखले देण्यात यावे अन्यथा १५ डिसेंबर रोजी सामुदायिक आत्मदहन करण्यात येईल. असा इशारा आदिवासी पारधी समाज परिवर्तन फाऊंडेशन परभणीचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
मौजा गिरोला येथील वडार समाजाचे यशवंतराव चव्हाण वसाहत योजनेखाली पुनर्वसन व्हावे याकरिता वेळोवेळी आंदोलने केली. पुनर्वसनाची प्रक्रिया सुरु झाली. परंतु या पुनर्वसनासाठी जातीच्या दाखल्याची आड-काठी येऊ लागली आहे. वडार समाजाला व कारधा येथील मांगगारुडी समाजाला १९६१ चा महाराष्ट्रातील वास्तव्याचा पुरावा मागीतला जात आहे. त्यात जातीचा उल्लेख असतो असे प्रशासनाचे मत आहे. परंतु आमच्या जवळ असलेल्या १९३० च्या शासकिय पुराव्यात जात नावाचा उल्लेख नाही. तरीही त्या व्यक्तिला वडार जातीचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
गिरोला येथील वडार समाजाचे पुनर्वसन करावयाचे असून जातीच्या दाखल्याअभावी त्यांचे पुनर्वसन राहू नये, यासाठी त्यांच्याजवळ ते पुरावे आहेत. त्याच्या आधारावर त्यांना व कारध्याच्या मांगगारुडी समाजाला तात्काळ जातीचे दाखले वितरीत करावेत, या दोन्ही समाजाकडे १९६१ चे कोणतेही अतिरिक्त पुरावे नाहीत. ते देऊच शकत नाहीत. १५ डिसेंबर २०१४ च्या आत वडार व मांग गारुडी समाजाला जातीचे दाखले वितरीत झाली नाही तर वडार समाज व मांगगारोडी समाज सामुदायीक आत्मदहन करेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
गिरोला येथील वडार समाज व कारधा येथील मांग गारोडी समाजाला जातीचे दाखले द्यावे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेखाली तात्काळ पुनर्वसन झालेच पाहिजे, संतोष पवार यांना आदिवासी शबरी घरकुल योजनेतून नझूलच्या जागेवर घर तात्काळ देण्यात यावेत यांचा समावेश आहे.(नगर प्रतिनिधी)