नियमित कर्ज फेडणाऱ्यांचे कर्ज माफ करा
By Admin | Updated: June 28, 2017 00:38 IST2017-06-28T00:38:37+5:302017-06-28T00:38:37+5:30
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचीही संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी,...

नियमित कर्ज फेडणाऱ्यांचे कर्ज माफ करा
मुख्यमंत्र्यांना निवेदन : भाजप पदाधिकाऱ्यांचे साकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचीही संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, त्यांचाही सातबारा कोरा करण्याची मागणी तुमसर पंचायत समितीचे माजी सभापती तथा भाजपचे गटनेते हिरालाल नागपुरे यांनी केली आहे.
या मागणीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नाना पटोले यांना दिले आहे. कर्जबाजारी व अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. येथे नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर मात्र अन्याय झाला आहे. २५ टक्के अनुदान तुटपुंजे आहे. अनुदानाऐवजी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे, असे निवेदन तुमसर पंचायत समितीचे माजी सभापती कलाम शेख तथा तुमसर पंचायत समितीचे गटनेते हिरालाल नागपुरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविले आहे. या संदर्भात भंडारा गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजगी व्यक्त होत आहे. याबाबत खा. पटोले यांना निवेदन दिले. कर्जमाफीबाबत संभ्रम आहे. कर्जबाजारीपासून मुक्त होण्यासाठी सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.