खेळाडूंनी मोजले पाण्यासाठी पैसे
By Admin | Updated: September 16, 2014 23:32 IST2014-09-16T23:32:19+5:302014-09-16T23:32:19+5:30
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात शालेय क्रीडा स्पर्धा सुरू आहे. यात सुविधांचा अभाव असून खेळाडूंना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

खेळाडूंनी मोजले पाण्यासाठी पैसे
ओबडधोबड मैदानात सामने : शालेय क्रीडा स्पर्धेत सुविधांचा अभाव
भंडारा : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात शालेय क्रीडा स्पर्धा सुरू आहे. यात सुविधांचा अभाव असून खेळाडूंना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली नसल्याने त्यांना पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहे. यासोबतच मैदान खेळण्यायोग्य नसल्याने इजा होण्याची शक्यता असतानाही वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली नाही.
विद्यार्थ्यांच्या अंगातील सुप्त गुणांचा विकास व्हावा यासाठी शालेय शिक्षण मंत्रालयाने शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन सुरू केले आहे. याअनुशंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. आज पहिल्या दिवशी १४, १७ व १९ वयोगटातील शालेय मुली व मुलांच्या क्रीडा स्पर्धा पार पडल्या. पावसाळयाचे दिवस असल्याने मागील आठवड्यात भंडारा शहरात पाऊस पडला. दरम्यान क्रीडा संकुलाच्या मैदानावर जनावरे चालले. चार दिवसांपासून पाऊस नसल्याने कडक उन्ह निघले आहे. त्यामुळे जनावरांच्या पायांची खुरे मैदानात स्पष्ट दिसून येत आहे. याच स्थितीत तिथेच क्रीडा स्पर्धा सुरू आहेत.
विशेषत: कबड्डी स्पर्धा ओबळ-धोबळ मैदानावर सुरू आहे. कबड्डीचे मैदान पाखन किंवा मऊ मातीने भरणे गरजेचे होते. मात्र क्रीडा विभागाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष करून ओबळ-धोबळ मैदानावरच कबड्डी स्पर्धा घेतल्या. अशावेळी खेळात सर्व्हिस घेऊन जाणाऱ्यास विरूध्द संघांचे खेळाडू मोठ्या शिताफिने पकडण्याचा प्रयत्न करतात. यावेळी खेळाडू तिथे पडून त्याला इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासोबतच नालीच्या बाजुलाच कबड्डीचे दुसरे मैदान बनविण्यात आले आहे. क्रीडा विभागाने नालीवर फोमची गादी टाकून अपघात होण्याचा संभावित धोका टाळण्याचा प्रयत्न केला असला तरी येथे खेळाडूला खेळादरम्यान इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असले तरी, खेळादरम्यान खेळाडूला इजा झाल्यास वैद्यकीय अधिकाऱ्याकडून औषधोपचार करता यावा, यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करणे व अत्यावश्यक सेवा म्हणून रूग्णवाहिका जिल्हा क्रीडा संकुलात ठेवणे गरजेचे होते. मात्र क्रीडा विभागाने याकडे दुर्लक्ष केले.
बाहेरगावावरून आलेल्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी सुविधा असणे आवश्यक आहे. निवासाची व्यवस्था असलेल्या ठिकाणी सुविधांचा अभाव दिसून आल्याने विद्यार्थी व शिक्षकांनी रोष व्यक्त केला. स्पर्धांसाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी भोजन, नास्ता व पाण्याची व्यवस्था नसल्याने अनेक शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:जवळचे पैसे खर्च केले. या स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांचे वजन करून त्यांना मैदानात उतरविणे गरजेचे होते. १७ वर्ष वयोगटात जिल्हा परिषद शाळा मोहाडी व लाखनी शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या सामन्यात लाखनीच्या खेळाडूंचे वजन करण्यात आले नाही. यात वजन गटाव्यतिरिक्त खेळाडू खेळत असल्याने त्यांचे वजन करावे, अशी मागणी मोहाडीचे शिक्षक एन. एम. बोडणे यांनी केली होती. त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने तिथे शाब्दिक फैरी झाल्या. जिल्हा क्रीडा अधिकारी विभागाने शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन सुरळीत होण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी खेळाडूंनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)