महिलांच्या पुढाकारातून सामाजिक एकोप्याचे दर्शन
By Admin | Updated: November 25, 2015 03:16 IST2015-11-25T03:16:36+5:302015-11-25T03:16:36+5:30
विवाह म्हटलं की, घरातील थोरामोठ्यांची लगबग दृष्टीक्षेपास पडते. विवाहकार्य उरकेपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यांवर एक वेगळाच

महिलांच्या पुढाकारातून सामाजिक एकोप्याचे दर्शन
राजस्व नगरवासीयांचा आदर्श : ५० तुळशींचा सामूहिक विवाह, सामूहिक भोजनाने वऱ्हाडी भारावले
प्रशांत देसाई ल्ल भंडारा
विवाह म्हटलं की, घरातील थोरामोठ्यांची लगबग दृष्टीक्षेपास पडते. विवाहकार्य उरकेपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यांवर एक वेगळाच आनंद झळकत असतो. विवाहाच्या मंगलमय वातावरणाचे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नवचैतन्य निर्माण होते. असाच काहीसा अनुभव मंगळवारी गणेशपूर येथील राजस्व वसाहतीत अनुभवाला मिळाला.
औचित्य जरी तुळशी विवाहाचे असले तरी, राजस्व नगरातील महिलांच्या पुढाकारातून हा आदर्श समाजासमोर आला तो खरोखरचं वाखाणण्याजोगा आहे. भंडारा शहरालगतच्या गणेशपूर ग्रामपंचायत हद्दीतील राजस्वनगरची अत्यंत सुखवस्तू वसाहत म्हणून ओळख निर्माण झाली आहे. या वसाहतीत सुमारे ३० ते ४० कुटुंब व काहींकडे भाडेकरू असे ५० ते ६० कुटुंब वास्तव्याला आहेत. यावर्षी येथील वसाहतवासीयांनी नवनवीन उपक्रम राबवून सामाजिक हीत जोपासण्याचा संकल्प केला आहे. विशेष म्हणजे, या सामूहिक तुळशी विवाहासाठी येथील महिलांचा पुढाकार महत्त्वाचा ठरला आहे. महिलांच्या पुढाकारातून साजरा झालेला हा सामूहिक तुळशी विवाह आदर्श व सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविणारा ठरला.
सकाळपासूनच तुळशी विवाहाची लगीनघाई सुरू होती असल्याने सायंकाळी सात नंतर तुळशी विवाहांना सुरुवात झाली. आंतरपाटाच्या एका बाजूला तुळस व दुसऱ्या बाजूला देव्हाऱ्यातील श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून मोठ्या उत्साहात मंगलाष्टकांच्या निनादात अक्षता टाकण्यात आल्या. विवाहापूर्वी ढोलताषा व सनईचे सुरही आळविण्यात आले. दिवाळीतील नवीन कपडे घालून बालचमूही व प्रत्येक घरातील महिला-पुरूष या सोहळ्यात आनंदाने सहभागी झाले होते. या विवाहावेळी श्रीकृष्ण-तुळशीला फराळाचा नैवद्यही दाखविण्यात आला. विवाहानंतर मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या सोहळ्यानंतर प्रत्येकांच्या चेहऱ्यावर विवाह आनंदात उरकल्याचे समाधान दिसून येत होते.
विवाहप्रसंगी मनोरंजनासाठी ठेवण्यात येत असलेल्या संगीत मैफिलचा आनंद तुळशी विवाहातही प्रत्येकांनी घेतला. या विवाहाचे खास आकर्षक ठरले ते, विवाहानंतरचे मिष्ठानांचे भोजन. सामूहिक एकोपा जोपासण्यासाठी सर्वांनी मिळून भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. राजस्व नगरातील हा उपक्रम समाजासाठी एक आदर्श ठरला.
धार्मिक विधीत सर्वांचा पुढाकार
४मंगलाष्टकांच्या सुरांना श्रद्धेची जोड देत मंगळवारला कार्तिक शुध्द १३ ला तुळशी विवाहाचा आणि तोही सामूहिक विवाह पद्धतीने धार्मिक विधी उत्साहात साजरा करण्यात आला. वसाहतीतील मुख्य मार्गावर नगरवासीयांनी मनुष्यांच्या लग्नप्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडपासारखा सुशोभीत मंडप उभारला होता. मंडपात आकर्षक रांगोळी, फुलांची तोरणे, विद्युत दिव्याच्या माळा गुंफण्यात आली होती. रहिवाशांनी त्यांच्या घरातील तुळशी वृंदावन सजवून मंडपात वधूसारखी सजवून आणली होती.
यांनी घेतला पुढाकार
४या विवाहातून सामाजिक एकोपा जपण्यासाठी हर्षा भुरे, राखी भुरे, रोशनी थोेटे, निता भांडारकर, पूनम मुळे, कांचन भुरे, सपना गभणे, अर्चना भांडारकर, वंदना सतदेवे, योजना महाजन, वैशाली जांगजोड, माधुरी जांगजोड, निता थोटे आदी महिलांनी पुढाकार घेतला.