धानपीक धोक्यात
By Admin | Updated: October 21, 2014 22:45 IST2014-10-21T22:45:18+5:302014-10-21T22:45:18+5:30
विधानसभा निवडणूक आटोपताच ग्रामिण भागात भारनियमनाने पुन्हा डोके वर काढले आहे. परिणामी शेतकऱ्यांवर रात्रीचा दिवस करून पिकांचे ओलीत करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची कुणीही

धानपीक धोक्यात
भारनियमनामुळे शेतकरी चिंताग्रस्त : नियमित वीजपुरवठ्याची मागणी
भंडारा : विधानसभा निवडणूक आटोपताच ग्रामिण भागात भारनियमनाने पुन्हा डोके वर काढले आहे. परिणामी शेतकऱ्यांवर रात्रीचा दिवस करून पिकांचे ओलीत करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची कुणीही दखल घेत नाही. कृषिपंपांचे भारनियमन वाढले असल्याने खरीप हंगामातील धानपिक धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांना नियमित वीज देण्याची मागणी केली जात आहे.
कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ अशा संकटाने शेतकरी पूर्णत: खचला आहे. संत्रा आंबिया बहरावर संत्रा उत्पादकांनी समाधान मानले. परंतु पावसाने एक महिन्यापासून दडी मारल्याने शेतातील पीक करपू लागली आहे. विहिरीत पाणी आहे. परंतु वीज भारनियमनामुळे शेतकऱ्यांना ओलीत करता येत नाही. यासंदर्भात वीज वितरण कंपनीकडे अनेकवेळा तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. अभियंते म्हणतात, भारनियमनाचे अधिकार आमच्याकडे नाही यामुळे शेतकऱ्यांनी जगावे की मरावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
वीज कार्यालयावर शेतकऱ्यांनी धडक देवून तातडीने वीज भारनियमन कमी करण्याची मागणी केली होती. परंतु अद्यापही भारनियमन कमी झाले नाही. तालुक्यात कृषी पंपाकरिता असलेला वीजपुरवठा वारंवार खंडित असतो.
भारनियमन वाढल्याने अनेकांना भारनियमनाचा फटका बसायला लागला आहे. काही भागात विद्युत रोहित्रांत बिघाड तर काही भागांत वीजपुरवठा खंडित करावा, अशी अवस्था असल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे. पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होणार हे निश्चित. एकीकडे निवडणुकीत कोट्यवधी रूपयांची उधळण तर दुसरीकडे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची चिंता आहे. डौलदार पिकांना ओलीत करण्याची गरज असताना विजेअभावी ओलिताचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न भंगण्याची दाट शक्यता असल्याने पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. (शहर प्रतिनिधी)