पिकाला परजिल्ह्यात मागणी : झाडगावच्या शेतकऱ्याचा नाविण्यपूर्ण प्रयोगभंडारा : जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील धान हे प्रमुख पीक आहे व शेतकरी पारंपारिक पद्धतीने पीक घेत आहेत. परंतु काही प्रयोगशील शेतकरी हे भातशेतीमध्ये इतर पीक घेत आहेत.पांडूरंग बाजीराव कापगते हे झाडगाव ता.साकोली येथील शेतकरी असून त्यांनी त्यांच्या शेतामध्ये काटे कोहळा लागवड केली आहे. त्यांच्याकडे एकूण ५.५० एकर जमीन असून त्यात त्यांनी मलचिंग व ठिंबक संचाची व्यवस्था केली आहे. कापगते गेल्या तीन वर्षापासून काटे कोहळा लागवड करीत आहेत. मागील वर्षापर्यंत त्यांनी डाळींब पिकामध्ये आंतरपिक म्हणून काटे कोहळाची लागवड केलेली होती. यावर्षी त्यांनी एका एकरामध्ये सलग लागवड केली आहे.याकरिता त्यांनी रायपूर येथून वाणाचे बियाणे विकत आणले. याकरिता बियाणे खर्च ३,२०० रुपये झाले. ते त्यांनी जुलै महिन्यात बेडवर लागवड केली. सदर पीक तीन महिने कालावधीचे असून त्याला सरासरी प्रती एकर २० हजार रुपये खर्च आहे. यामध्ये नांगरटी, खते, बियाणे, मजूर खर्च समाविष्ट आहे. दहा फुट अंतरावर सरी व एक फुट झाडांतील अंतर ठेवले आहे. लागवडीनंतर दोन महिन्यात फुलावर येवून एका महिन्यात काटे कोहळा मोठा होवून काढणीस तयार होते. काटे कोहळ्यावरती पांढरट पावडर चढला की कोहळ्याची काढणी करतात. यावर्षी त्यांना एका एकरामध्ये दहा टन काटे कोहळा उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी त्यांना प्रती किलो ७.५० रु. भाव मिळाला होता. सदर काटे कोहळाची हल्दीराम ग्रुप नागपूरला विक्री करतात. याकरिता ते गाडीने नागपुरला काटे कोहळा स्वत: नेवून देतात. याकरिता त्यांना साधारण: ६ हजार रुपये खर्च येतो.साधारणत: प्रती एकर २६ हजार रुपये खर्च आला असून उत्पादन ९० हजाराचे अपेक्षित आहे. आतापर्यंत त्यांनी ८ टन उत्पादन काढले असून काढणी सुरु आहे. यामधून त्यांना प्रती एकर ६० हजार ते ६५ हजार रुपयांचा नफा अपेक्षित आहे.सदर पिकाविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की, लागवडीकरिता पाण्याची निचरा होणारी जमीन पाहिजे. काटे कोहळा वर्षभर घेता येतो. फक्त एप्रिल, मे व जून महिन्यात फळधारणा नको, जास्त उष्णतामुळे फळधारणा कमी होऊन लहान आकाराचे काटे कोहळा तयार होतो. त्यामुळे बाजारात भाव मिळत नाही. तसेच सदर वाणाची लागवड केल्यास प्रती कोहळा वजन २० ते २२ किलोपर्यंत जातो. बाजारामध्ये मोठ्या आकारमानाच्या काटे कोहळ्याला मागणी जास्त असून भाव जास्त मिळतो. तसेच लागवड करताना एका दिवशी लागवड न करता काही दिवसाचा कालावधी सोडून लागवड करावी. त्यामुळे मशागतीला सोपे होवून विक्रीकरिता सुलभ होते. कापगते यांच्याकडील काटे कोहळा आकारमानात इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत खूप मोठा असल्यामुळे त्यांना हल्दीराम ग्रुप नागपूर कडून वर्षभर माल पुरवठा करण्याकरिता सांगितले जाते. सदर शेतावर उषा डोंग़रवार, कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र साकोली पी.पी. पर्वते विषयतज्ज्ञ (विस्तार) वायआर. महल्ले विषयतज्ज्ञ (कृ.अभियांत्रीकी), धनंजय मोहोड (फार्म प्रबंधक) यांनी भेट दिली व माहिती जाणून घेतली. तसेच अधीक उत्पादनाकरिता तांत्रिक माहिती दिली व मार्गदर्शन केले आहे. (नगर प्रतिनिधी)
पारंपारिक भातशेतीमध्ये काटेकोहळा उत्पादन
By admin | Updated: October 3, 2016 00:29 IST