लोकसहभाग गाव विकासाचे माध्यम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2017 00:17 IST2017-06-11T00:17:53+5:302017-06-11T00:17:53+5:30
श्रम प्रतिष्ठेचे संस्कार प्रत्येकाने घरातूनच रूजविले पाहिजे. गावाच्या विकासात श्रमदानाला खूप महत्व आहे.

लोकसहभाग गाव विकासाचे माध्यम
कृष्णा मोरे यांचे प्रतिपादन : गाळ काढण्याचे काम
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : श्रम प्रतिष्ठेचे संस्कार प्रत्येकाने घरातूनच रूजविले पाहिजे. गावाच्या विकासात श्रमदानाला खूप महत्व आहे. गावाची दिशा पालटून टाकण्याची क्षमता श्रमदानात असते. श्रमदानाच्या खारीच्या वाट्यातून मोठी कामे होवू शकतात. त्यासाठी गावकऱ्यांनी श्रमदानासह लोकपुंजी जमा करून गावाच्या विकासात हातभार लावावा, असे प्रतिपादन मोहाडी पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी कृष्णा मोरे यांनी केले.
सीतेपार (झंझाड) येथील मालगुजारी तलावातील गाळ काढण्याचे काम लोकसहभागातून करण्यात आले. कामाप्रारंभी उद्घाटन खंडविकास अधिकारी कृष्णा मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी जनतेला मार्गदर्शन त्यांनी केले. यावेळी सरपंच प्रितलाल गजभिये, उपसरपंच टिकाराम ठवकर, ग्रामसेवक गोपाल बुरडे, सुधाकर चेटवले, रंगलाल झंझाड, भारत माटे, राजू झंझाड आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
लोकसहभागातून तलावातील गाळ काढण्याचे पहिले काम सितेपार झंझाड या गावी करण्यात आले. सरपंच व गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन काम केले. खंडविकास अधिकारी कृष्णा मोरे यांनी मालगुजारी तलावातील गाळ काढण्यासाठी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले होते. गावकऱ्यांनी त्यांच्या हाकेला साद दिली.
त्यामुळे प्रशासनाच्या वतीने कान्हळगाव येथील सुधीर भोयर यांची जेसीबी देण्यात आली. तसेच काढलेली गाळ वाहून नेण्यासाठी गावातील अंकुश वैद्य, शेखर झंझाड, रमजान शेख, सोमेश्वर अतकरी, मनोज गयगये, ज्ञानदीप गजभिये, शरद झंझाड, चंद्रशेखर झंझाड यांनी स्वत:चे ट्रॅक्टर पुरविले. तसेच जयेंद्र गजभिये, रंगलाल झंझाड, घनश्याम शिंदे, शंकर चटेवले, सीताराम कुन्ने, सोमेश्वर अतकरी, श्रावण झंझाड, प्रमोद बागडे, मोहन माटे, भोजराम झंझाड या शेतकऱ्यांनी गाळ काढण्यासाठी मदत केली.