सिहोरा ठाण्यात ग्रामस्थांचा ठिय्या
By Admin | Updated: August 9, 2014 23:31 IST2014-08-09T23:31:53+5:302014-08-09T23:31:53+5:30
सिंदपुरी येथील तलाठ्याने आपातग्रस्तांना मिळणाऱ्या नुकसानभरपाईची यादी बनविताना अनेकांना डावलण्यात आल्याचा आरोप सभापती कलाम शेख यांनी केला होेता.

सिहोरा ठाण्यात ग्रामस्थांचा ठिय्या
तुमसर : सिंदपुरी येथील तलाठ्याने आपातग्रस्तांना मिळणाऱ्या नुकसानभरपाईची यादी बनविताना अनेकांना डावलण्यात आल्याचा आरोप सभापती कलाम शेख यांनी केला होेता.
याप्रकरणी तलाठी भावे यांनी सभापतींनी कामात व्यत्यय आणल्याची तक्रार पोलिसात दिल्याने सभापतींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शेख यांच्या नेतृत्वात सिंदपुरवासीयांनी आज दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत सिहोरा पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.
सिंदपुरी येथील मामा तलाव फुटल्याने शेकडो गाववासीयांना त्याचा फटका बसला. शासनाकडून नुकसानभरपाई त्वरीत मिळावी या अपेक्षेत आपादग्रस्त आहेत. मात्र महसूल विभागाचे स्थानिक तलाठी भावे हे कर्तव्यात कुचराईपणा करीत आहे.
तलाठ्यांनी ज्या प्रभावित घरांची किंवा ज्यांची नुकसान झाले अशांचे नावे नुकसानग्रस्तांच्या यादीत न घेता अन्य लोकांच्या नावांचा समावेश केला आहे. त्यामुळे सभापती कलाम शेख यांनी तलाठ्याला सुटलेली नावे यादीत समाविष्ट करण्याचे सुचविले. दरम्यान तलाठी भावे यांनी सभापती शेख यांच्या विरोधात सिहोरा पोलीस ठाण्यात त्यांना कर्तव्यात आडकाठी करून शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याची तक्रार दाखल केली.
तलाठी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळामुळे ठाणेदार रमेश इंगोले यांनी सभापती शेख यांच्या विरोधात २५३, ५५३ अन्वये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यामुळे सिंदपुरीवासीयांमध्ये संताप पसरला. आज सभापती शेख यांच्या नेतृत्वात सिंदपुरीवासीयांनी त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीला घेऊन ठाण्यात दुपारी १२ ते ५ पर्यंत ठिय्या आंदोलन केले.
सदर गुन्हे मागे घेऊन कर्तव्यात कुचराईपणा करणाऱ्या तलाठ्यावर निलंबनाच्या कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा १५ आॅगस्टला जनआंदोलन करण्याचा इशारा शेख यांनी यावेळी ठाणेदाराला दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)