१,७३५ कृषिपंप वीज जोडणीपासून प्रलंबित
By Admin | Updated: August 13, 2015 01:23 IST2015-08-13T01:23:25+5:302015-08-13T01:23:25+5:30
मागील वर्षी १,५७१ वीज जोडणीपासून प्रलंबित असलेल्या कृषिपंपांची पूर्तता सन २०१५-१६ मध्ये करण्याचे उद्दिष्ट ...

१,७३५ कृषिपंप वीज जोडणीपासून प्रलंबित
देवानंद नंदेश्वर भंडारा
मागील वर्षी १,५७१ वीज जोडणीपासून प्रलंबित असलेल्या कृषिपंपांची पूर्तता सन २०१५-१६ मध्ये करण्याचे उद्दिष्ट वीज वितरण कंपनीला आहे. यातील ८५४ कृषिपंपांची जोडणी जुलैअखेरपर्यत करण्यात आलेली आहे. १,७३५ शेतकऱ्यांनी रक्कम भरुनही त्यांच्या कृषिपंपांची अद्यापही जोडणी झालेली नाही. जुलै २०१५ अखेरपर्यत ३६,५८२ कृषिपंपांची जोडणी झाली आहे. यात मागील पाच वर्षांत १२,५५० कृषिपंपांच्या विद्युतीकरणाचा समावेश आहे.
केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांसाठी योजना राबवित असले तरी भंडारा जिल्ह्यातील १,७३५ शेतकरी कृषिपंप वीज जोडणीपासून वंचित आहेत़ याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. १,५७१ प्रलंबित वीज जोडणी यावर्षीच्या सत्रात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट वीज वितरण कंपनीला दिलेले आहे़ यातील ८५४ कृषिपंपांचे विद्युतीकरण झाले.
भंडारा जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका सहन करावा लागत आहे़ कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी पूर्णत: खचलेला आहे़ शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या सहायाने शेती करण्यासाठी विशेष योजना आखली़ कृषिपंपाच्या सहायाने खरीपासह रबी पिकांची लागवड करुन जीवनमान उंचवावे, अशी शासनाची अपेक्षा आहे़ परंतु भंडारा जिल्ह्यात जुलैअखेरपर्यंत १,७३५ शेतकऱ्यांनी रक्कम भरुनही कृषिपंपाचे विद्युतीकरण झालेले नाही. यामध्ये भंडारा तालुक्यात २४७, मोहाडी तालुक्यात २२१, तुमसर तालुक्यात ९५, पवनी तालुक्यात २१६, साकोली तालुक्यात ३०६, लाखनी तालुक्यात ४७८ तर लाखांदूर तालुक्यात १७२ शेतकऱ्यांचा समावेश आहे ़
वीज वितरण कंपनीकडून देण्यात येणारी कृषिपंप वीजजोडणी दि़३१ मार्च २०१४ अखेर १,५३२ इतकी प्रलंबित होती़ २०१४-१५ या वर्षात २,७९८ कृषिपंप वीज जोडणीचे अर्ज प्राप्त झाले़ त्यामुळे ३१ मार्च २०१५ पर्यत एकुण ४,३३० अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी २०१४-१५ मध्ये भंडारा जिल्ह्यात २,७५९ वीज जोडणी करण्यात आली़ यात भंडारा तालुक्यात १९२, मोहाडी तालुक्यात १८६, तुमसर तालुक्यात १६२, पवनी तालुक्यात ६७६, साकोली तालुक्यात ५११, लाखनी तालुक्यात ५२६ तर लाखांदूर तालुक्यात ५०६ वीज जोडणीचा समावेश आहे़
३१ मार्च २०१४ अखेर १,५३२ कृषिपंपाची वीज जोडणी प्रलंबित होती़ यामध्ये भंडारा तालुक्यात २०५, मोहाडी तालुक्यात ३३६, तुमसर तालुक्यात ९८, पवनी तालुक्यात ३३९, साकोली तालुक्यात २११, लाखनी तालुक्यात २८२ तर लाखांदूर तालुक्यात ६१ वीज जोडणींचा समावेश होता़ सन २०१४-१५ यावर्षात २,७९८ अर्ज वीज वितरण कंपनीकडे प्राप्त झाले़
यामध्ये भंडारा तालुक्यात २२५, मोहाडी तालुक्यात ६०, तुमसर तालुक्यात १५७, पवनी तालुक्यात ५४५, साकोली तालुक्यात ५६९, लाखनी तालुक्यात ६७८ तर लाखांदूर तालुक्यात ५६४ अर्ज वीजजोडणीसाठी प्राप्त झाले होते़ मागील वर्षीचे प्रलंबित १,५७१ वीजजोडणी सन २०१५-१६ वर्षात पूर्ण करण्याचा लक्षांक आहे़ त्यापैकी ८५४ कृषिपंपांचे विद्युतीकरण झाले.
खरीप व रबी अशा दोन्ही हंगामात उत्पादन घेता यावे म्हणून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी विविध योजनांतर्गत शेतात विहिरी व बोअरवेल केल्या आहेत. यानंतर वीज पुरवठ्यासाठी वीज वितरणकडे रितसर अर्ज केले. त्यासाठी आवश्यक त्या रकमेचा भरणाही केला. जुलै २०१५ अखेरपर्यत जिल्ह्यातील १,७३५ शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नाही. यामुळे विहीर व पाणी असतानाही सिंचन करणे अशक्य झाले. शासनाने विविध योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात सिंचन विहिरी खोदून देण्याची योजना आखली.
या योजनांचा लाभ घेत हजारो शेतकऱ्यांनी सिंचन विहिरीसाठी अर्ज केले. त्यानुसार विहिरी मंजूर झाल्या. खोदकाम, बांधकाम पार पडले. याला एक ते अडीच वर्षांचा कालावधी लोटला; पण त्या विहिरी शेतकऱ्यांच्या उपयोगी पडल्या नाहीत. विहिरी पूर्ण झाल्यानंतर वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांनी विद्युत कंपनीकडे अर्ज केले. यासाठी लागणारी अनामत रक्कम भरल्यानंतर वीज पुरवठा होईल, अशी अपेक्षा असताना शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळालेली नाही, हे वास्तव आहे.