तुमसर येथे शंभर रेल्वे प्रवाशांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 22:59 IST2018-12-21T22:59:22+5:302018-12-21T22:59:35+5:30
रेल्वेच्या भरारी पथकाने तुमसर रोड रेल्वे स्थानकावर शुक्रवारी शंभर प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करून ५० हजार रूपये वसूल केले. सदर कारवाई रेल्वे न्यायाधीशांच्या उपस्थितीत करण्यात आली. या कारवाईने रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली.

तुमसर येथे शंभर रेल्वे प्रवाशांना दंड
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : रेल्वेच्या भरारी पथकाने तुमसर रोड रेल्वे स्थानकावर शुक्रवारी शंभर प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करून ५० हजार रूपये वसूल केले. सदर कारवाई रेल्वे न्यायाधीशांच्या उपस्थितीत करण्यात आली. या कारवाईने रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली.
मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे, रेल्वे न्यायाधीश ए.डब्ल्यु. क्षीरसागर यांच्या पथकाने तुमसर रेल्वे स्थानकावर आज कारवाई केली. यात विना तिकीट प्रवास करणे, महिलांच्या डब्यातून पुरूषांनी प्रवास करणे, रेल्वे स्थानकावर नियमबाह्य रेल्वे ट्रॅक पार करणे, स्थानकावर विना तिकीट प्रवास करणे आदींचा त्यात समावेश आहे. रेल्वे अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली. यात स्थानिक रेल्वेचे पोलीस निरीक्षक विजय भालेकर, ओ.पी. गुर्जर, ताराचंद कुमावत, प्रभाग दुबे, महेश सैनी, अखिलेश तिवारी आदी सहभागी होते. यावेळी रेल्वे समितीचे सदस्य आलम खान उपस्थित होते.
एक ते दीड महिन्यानंतर रेल्वेचे भरारी पथक स्थानकावर धडक कारवाई करीत आहे. परंतु त्यापासून रेल्वे प्रवाशी धडा घेत नाही. तुमसर रेल्वे स्थानकावर फुटवे ब्रीज रेल्वे स्थानकाबाहेर काढण्याची गरज आहे. येथे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. विना तिकीट रेल्वे फलाटावर स्थानिक नागरिक एका टोकावून दुसऱ्या टोकावर जातात. त्याचा रेल्वे स्थानकावरून जाण्यास नाईलाज आहे. सदर कारवाईमुळे ग्रामस्थात असंतोष निर्माण झाला आहे.
तुमसर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेत अनेक प्रवाशी विनातिकीट प्लॅटफॉर्मवर शिरतात. तसेच गावातील नागरिक रूळावरून बिनधास्तपणे जाताना दिसतात. आता या मोहिमेमुळे या प्रकाराला आळा बसण्याची शक्यता वर्तविली आहे.