धान कापणी व बांधणीच्या हंगामाला वेग
By Admin | Updated: October 23, 2016 01:05 IST2016-10-23T01:05:57+5:302016-10-23T01:05:57+5:30
पावसाच्या विश्रांतीनंतर हलके व मध्यम धान काढणीला एकाचवेळी आल्याने मजुरांची जुळवा जुळव करताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

धान कापणी व बांधणीच्या हंगामाला वेग
मजुरी वाढूनही मजूर मिळेना : शेतकऱ्यांच्या समस्या सुटता सुटेना
मुखरू बागडे पालांदूर
पावसाच्या विश्रांतीनंतर हलके व मध्यम धान काढणीला एकाचवेळी आल्याने मजुरांची जुळवा जुळव करताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ५० ते १०० रूपये ने वाढ झाल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्या तुलनेत धानाच्या आधारभूत किमतीत अपेक्षित वाढ न झाल्याने आर्थिकदृष्ट्या शेतकरी मागे जात आहे. १०० ते १२५ दिवसाचे धान कापणीला एकाचवेळी आले. त्यामुळे मजुरांची टंचाई जाणवत आहे.
प्रति एकर कापणी १००० ते १२०० रूपयापर्यंत दराने सुरू असून बांधणीचा सुद्धा दरही त्याचप्रमाणे आहेत. धान्य रूपात एका एकराकरीता १७० ते १५० किलो धान कापणी व बांधणी ठरत आहे. मळणीकरीताही दर वाढून १०० रूपये खंडी किंवा ५० रूपये पोत्याप्रमाणे दर सुरू झालेले आहेत. एकंदरीत नित्याने धान उत्पादनाचा खर्च वाढीचा सामना करावाच लागतो. हा खर्च कमी करण्याकरीता रोहयोचा आधार देण्याची नितांत गरज आहे. सोमवारपासून हमी धान खरेदी सुरू होत असल्याची कबुली जिल्हा मार्केटिंग अधिकारी हनुमंत पवार यांनी दिल्याने शेतकऱ्यांना थोडासा धीर मिळाला आहे. बोनस विषयी निर्णय लवकर झाल्यास खासगीत धान अत्यल्प विकल्या जाईल. नगदी रूपयाकरीता २०० ते २५० रूपयाचा तोटा सहन करून शेतकरी रोजची गरज भागविण्याकरीता धान व्यापाऱ्याला विकत आहे. कृषी विभागाकडून नुकसानग्रस्तांचे सर्वेक्षण सुरू असून अनुदानाकरिता लोकप्रतिनिधींनी प्रामाणिक प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.
शेतकरी निसर्गाच्या भरवशावर असल्यामुळे आणि सिंचन सुविधा नसल्यामुळे शेतकरी संकटात आहे. शासनाने धोरण राबवून पुढाकार घेण्याची गरज आहे. रोहयो अंतर्गत शेतीचे मुख्य कामे केली तर शेतकऱ्यांना व मजुरांनासुद्धा सोयीचे होईल.
- वर्षा रामटेके, जि.प. सदस्या पालांदूर.
कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतांचे पंचनामे पारदर्शक करून लहान मोठे सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा. पिकविम्याकरीता कंपनी सहकार्य करीत नसल्याने पिकविमा योजना फसवी ठरत आहे.
- विजय कापसे, अध्यक्ष सेवा सहकारी संस्था पालांदूर.