पवनीत पोलिस वसाहत दुर्लक्षित
By Admin | Updated: June 19, 2015 01:00 IST2015-06-19T01:00:38+5:302015-06-19T01:00:38+5:30
इंग्रजांच्या काळात आणि नंतर कित्येक वर्षे हाफपँटवाले पोलिस होते. पोलिसांचे गणवेश बदलले, राहणीमानात बदल झाला. अलिकडे सर्व माहिती इंटरनेटवर जायला लागली.

पवनीत पोलिस वसाहत दुर्लक्षित
अशोक पारधी पवनी
इंग्रजांच्या काळात आणि नंतर कित्येक वर्षे हाफपँटवाले पोलिस होते. पोलिसांचे गणवेश बदलले, राहणीमानात बदल झाला. अलिकडे सर्व माहिती इंटरनेटवर जायला लागली. परंतु पोलिस ठाण्याच्या बाजूला उभ्या जिर्णावस्थेत असलेल्या ब्रिटीशकालीन पोलिस वसाहतीच्या दोन इमारती अजूनही वापरात आहेत. पोलिस वसाहत मातीच्या भिंती उभारुन निर्माण करण्यात आलेली आहे. मात्र त्यानंतर कित्येक वर्षांनी निर्माण केलेली आवार भिंत पाडून नव्याने आवार भिंत बांधण्याचे काम सुरु आहे. आवार भिंतीने पोलिसांची काय सोय होणार? असा प्रश्न विचारल्या जात आहे.
पोलिस ठाण्याची इमारत २०८ चौरस मीटर जागेवर आहे. ६ निवासी गाळे असलेली एक वसाहत ५०० चौ. मी. जागेवर तर अन्य ६ निवासी गाळे असलेली वसाहत २८० चौ.मी. जागेवर बांधलेली आहे. पोलिस निरीक्षकांचे निवासस्थान १४४ चौ. मी. जागेत बांधण्यात आलेले आहे.
बांधकाम असलेले क्षेत्र सोडून त्यापेक्षा अधिक मोकळी जागा उपलब्ध असताना जिर्ण पोलिस वसाहत निर्लेखित करुन नव्याने बांधण्याचे गरज आहे. परंतु दरवर्षी जिर्ण इमारतीवर, मोकळ्या जागेत सिमेंट काँक्रीट टाकून व आवारभिंत बनवून फार मोठी रक्कम खर्च करण्यात येत आहे. पंरतु पोलिस कर्मचाऱ्यांसाठी इमारत बनविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, शासनाचा गृहविभाग लक्ष केंद्रित करीत नाही. यात काम गौडबंगाल आहे, हे समजण्यास मार्ग नाही.
पोलिस ठाण्यात १ पोलिस निरीक्षक, ३ पोलिस उपनिरीक्षक व ५० पोलिस हवालदार कार्यरत आहेत. पोलिस निरीक्षकांसाठी निवासस्थान आहे. परंतु पोलिस उपनिरीक्षकांना गावात भाड्याने राहावे लागते. तसेच १२ निवासी गाळ्यापैकी ३ गाळे राहण्यायोग्य नाही. केवळ ९ गाळ्यात पोलिस वास्तव्यात आहेत. उर्वरित ३१ पोलिस हवालदारांना गावात भाड्याने राहावे लागत आहे.
पोलिस कर्मचारी २४ तास कार्यरत असल्याने त्यांना पोलिस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर निवास स्थान उपलब्ध झाल्यास विभागातील कामात गतीमानता आणता येईल. वसाहत निर्मितीच्या कामात प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून धूळखात आहे.