पवनीत मद्यपी पर्यटकांचा धिंगाणा
By Admin | Updated: May 17, 2016 00:15 IST2016-05-17T00:15:51+5:302016-05-17T00:15:51+5:30
पवनीपासून चार किमी अंतरावरील उमरेड - कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पांतर्गत पवनी पर्यटन प्रवेशद्वारासमोर काही पर्यटकांनी दारू पिऊन धिंगाणा घातला.

पवनीत मद्यपी पर्यटकांचा धिंगाणा
गुन्हा दाखल : वन्यजीवप्रेमींमध्ये संताप
पवनी : पवनीपासून चार किमी अंतरावरील उमरेड - कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पांतर्गत पवनी पर्यटन प्रवेशद्वारासमोर काही पर्यटकांनी दारू पिऊन धिंगाणा घातला. या घटनेमुळे पवनी तालुक्यातील वन्यप्रेमी संतप्त झाले आहेत.
१५ मे रोजी सायंकाळी ४ ते ४.३० च्या सुमारास नागपूर येथील चार पर्यटक एम.एच.४९/यु.१६०९ या पांढऱ्या रंगाच्या मारूती कारने जंगल सफारीकरीता आॅनलाईन बुकींग करून आले. आधीच मद्यप्राशन करुन आलेल्या या पर्यटकांच्या त्यांच्या वाहनात विदेशी दारूसुध्दा आढळून आली. त्यामुळे त्यांना जंगल सफारीसाठी प्रतिबंध घालण्यात आला. अभयारण्यात प्रवेशापासून वंचित राहावे लागल्यामुळे मद्य प्राशन केलेल्या या पर्यटकांनी तेथील वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व मार्गदर्शकासोबत बाचाबाची केली व शिवीगाळ करुन मारण्याची व पाहून घेण्याची धमकी दिली.
याप्रकरी घटनेची तक्रार वनरक्षक माधुरी न्यायमूर्ती यांनी पवनी पोलिसांत केली. त्यांच्या तक्रारीवरून नागपूर येथील अमित श्रीराम जाधव (३७), प्रफुल विठ्ठल लोही (३३), चंद्रकांत पांडुरंग वाघमारे (३७), सचिन संपत गुगसे या चारही पर्यटकांना पवनी पोलिसांनी ताब्यात घेतले. काही वेळाने त्यांना सोडण्यात आले. चारही पर्यटाकवरिुध्द पवनी पोलीस ठाण्यात भादंवि सहकलम ८५(१), ६५(ई), मदाका सहकलम १८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सदर वाहन जप्त केले असून पवनी पोलीस तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)