फुटपाथ दुकानदारांना गाळे मिळणार
By Admin | Updated: January 13, 2017 00:12 IST2017-01-13T00:12:03+5:302017-01-13T00:12:03+5:30
जिल्हा प्रशासनाने फुटपाथ दुकानदारांची कोणतीही तगा न बाळगता अतिक्रमण हटविण्याची मोहिम सुरू करीत सर्व फुटपाथ धारकांची दुकाने जमिनदोस्त केली.

फुटपाथ दुकानदारांना गाळे मिळणार
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल : शिवसेनेच्या उपोषणाची सांगाता
भंडारा : जिल्हा प्रशासनाने फुटपाथ दुकानदारांची कोणतीही तगा न बाळगता अतिक्रमण हटविण्याची मोहिम सुरू करीत सर्व फुटपाथ धारकांची दुकाने जमिनदोस्त केली. त्यामुळे फुटपाथ धारकांच्या कुटूंबियावर उपासमारीची वेळ आली. याविरोधात शिवसेनेचे शहर प्रमुख सुर्यकांत इलमे यांच्या नेतृत्वात ९ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते. दरम्यान, या आंदोलनाची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत फुटपाथ धारकांना व्यापारी गाळे उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश न.प. मुख्याधिकाऱ्यांना दिले. १० जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता मुख्याधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत गाळे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिवसेनेने उपोषण मागे घेतले.
जिल्हा प्रशासनाने २७ डिसेंबरपासून शहरातील अतिक्रमण काढण्याची मोहिम हाती घेतल्यानंतर सर्वच फुटपाथ दुकाने हटविण्यात आले. अतिक्रमण काढण्यास विरोध नाही. परंतु फुटपाथ दुकानदारांवर उपासमारीची वेळ आणली आहे. फुटपाथ दुकानदारांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे अन्यथा ९ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख सूर्यकांत इलमे यांनी दिला होता. फुटपाथ विक्रेत्यांनी केंद्र सरकारच्या विधेयकाची अंमलबजावणी करण्यात यावी, फुटपाथ विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी शिवसेनेचे शहर प्रमुख सूर्यकांत इलमे यांच्या नेतृत्वात फुटपाथ धारकांनी ९ जोनवारीपासून जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी फुटपाथ धारकांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश न.प. मुख्याधिकारी अढागळे यांना दिले. मुख्याधिकाऱ्यांनी फुटपाथधारकांच्या दुकान गाळ्यांसाठी भुखंडाचा शोध घेण्याचे आदेश निर्देश अधिनस्त अधिकाऱ्यांना दिले आहेत. तथापि, मुख्याधिकारी अढागळे यांनी १० जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता सूर्यकांत इलमे व उपोषणकर्त्यांची भेट घेवून फुटपाथ धारकांसाठी लवकरात लवकर दुकान गाळे उपलब्ध करून देण्याची कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. मुख्याधिकाऱ्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चे अंती उपोषणकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. तसेच मागण्या मान्य न झाल्यास आणखी उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारासुद्धा यावेळी देण्यात आला. यावेळी शिवसेनेचे शहर अध्यक्ष सुर्यकांत इलमे, मुख्याधिकारी अढागळे, वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक गोकूळ राऊत, पुरूषोत्तम खापेकर, गणेश धकाते, गणेश बारापात्रे, महेंद्रसिंग गहेरवार, देवदास करवाडे, मुकेश थोटे, जयंत बोटकुले, प्रेमदास धारगावे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)