तलावाच्या पाळीला पडल्या भेगा
By Admin | Updated: September 8, 2016 00:34 IST2016-09-08T00:34:13+5:302016-09-08T00:34:13+5:30
जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत पाणी साठवण करण्याची महत्वाकांक्षी योजना राज्य शासनाने अंमलात आणली.

तलावाच्या पाळीला पडल्या भेगा
नरसिंगटोला येथील प्रकार : तुमसर वनविभागाने तयार केला तलाव, गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
तुमसर : जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत पाणी साठवण करण्याची महत्वाकांक्षी योजना राज्य शासनाने अंमलात आणली. तुमसर वनपरिक्षेत्राअंतर्गत जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जलसाठवण तलावाला पहिल्याच पाण्यात मोठे भगदाड पडले आहे. सध्या या तलावात अल्प प्रमाणात पाणी शिल्लक आहे. लाखोंचा निधी येथे वाया गेले. निकृष्ठ जलसाठवण तलाव केल्याचे येथे दिसून येते. अंदाजपत्रकानुसार कामे न झाल्याची येथे शक्यता आहे.
तुमसर वनपरिक्षांतर्गत नरसिंगटोला येथे जलसाठवण तलाव उन्हाळ्यात तयार करण्यात आले. याची किंमत २ लक्ष ९० हजार इतकी आहे. ३० मीटर रुंद, ३० मी. लांब व ३ मीटर खोल असा हा जलसाठवण तलाव आहे. तलावाचे काम तांत्रीकदृष्ट्या सदोष आहे. तलावात जेथून पाण्याचा प्रवाह येतो तिथे पीचींगचे कामे करण्यात आली नाही. एकुण तलावाला सुद्धा पिचिंग केली नाही. तलावातील अतिरिक्त पाणी जाणाऱ्या मार्गावरही पिचिंग नाही. यामुळे तलाव क्षतीग्रस्त झाला आहे.
या जलसाठवण तलावाला मोठी भेगा पडली आहे. येथून पाणी वाहून गेले. जलसाठवण तलावाचा मुख्य हेतु पाणी साठवण करण्याचा होता तो हेतु येथे पूर्ण झाला नाही. या तलावाच्या नविदा प्रक्रियेवरही एका कंत्राटदाराने प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. अंदाजपत्रकानुसार या जलसाठवण तलावाची कामे झाली नाही अशी माहिती आहे. पहिल्याच पावसात तलावाचा काही भाग वाहून गेला. यावरून जलसाठवण तलावाची गुणवत्ता कशी असेल हे दिसून येते.
जेसीबीने जलसाठवणूक तलाव तयार करण्यात येतो. शासनाच्या नियमानुसार मोजमाप पुस्तीका असते. त्या मोजमाप पुस्तीकेवर संबंधितांनी कशी स्वाक्षरी केली हा मुख्य प्रश्न आहे. या प्रकरणाची उपवनसंरकाकडे तक्रार करण्यात आली आहे. परंतु अद्याप कारवाई झाली नाही. तुमसर वनपरिक्षेत्राव्यतिरिक्त इतरही वनपरिक्षेत्रात जलसाठवण तयार करण्यात आले आहे. राज्य शासनाचा हा ड्रीम प्रोजेक्ट असून स्वत: मुख्यमंत्री जलसाठवण तलावांचा आढावा घेतात. तर अशा तलावांचा कोण आढावा घेणार हा प्रश्न येथे उपस्थित होतो. (तालुका प्रतिनिधी)
नरसिंगटोला येथील जलसाठवण तलावाचे काम नियमानुसार व तांत्रिकदृष्ट्या झाले आहे. तलावाला भेग पडली काय? याची पाहणी करण्यात येईल. नंतरच त्याविषयी बोलता येईल. तलाव व इतर ठिकाणी पिचिंगची तरतूद नाही.
- ए.आर. जोशी
वनपरिक्षेत्राधिकारी, तुमसर