अत्यल्प मजुरीवर खड्डय़ांचे खोदकाम
By Admin | Updated: May 29, 2014 23:46 IST2014-05-29T23:46:44+5:302014-05-29T23:46:44+5:30
तुमसर तालुक्यातील लेंडेझरी वनपरिक्षेत्रात वृक्ष लागवडीकरिता वन विभागाने ३५ हजार खड्डे मजुरांकडून खोदून घेतले. वनविभागाने प्रतिखड्डा नऊ रुपये दराप्रमाणे मजुरी द्यायची होती.

अत्यल्प मजुरीवर खड्डय़ांचे खोदकाम
तुमसर : तुमसर तालुक्यातील लेंडेझरी वनपरिक्षेत्रात वृक्ष लागवडीकरिता वन विभागाने ३५ हजार खड्डे मजुरांकडून खोदून घेतले. वनविभागाने प्रतिखड्डा नऊ रुपये दराप्रमाणे मजुरी द्यायची होती. परंतु सात रुपये मजुरी देण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे.
लेंडेझरी वनपरिक्षेत्राचा समावेश संरक्षित वनक्षेत्रात होतो. जंगल हिरवेगार राहावे याकरिता दरवर्षी वन विभाग वृक्ष लागवड करतो. यावर्षीच्या उन्हाळ्यात येथे ३५ हजार खड्डे (एक फूट बाय एक फूट) खोदण्याचे नियोजन करण्यात आले होते. वन विभागाच्या नियमानुसार प्रती खड्डा नऊ रुपये द्यायचे होते. परंतु काही मजुरांचे दोन रुपये कपात करुन सात रुपये देण्यात आले.
आलेसूर येथील जंगलात कंपार्टमेंट क्रमांक ५0 मध्ये ४८ मजूर होते. त्यांनी ३५ हजार खड्डे खोदले. २५ हेक्टर परिसरात हे खड्डे तयार करण्यात आले. खड्डय़ांचा आकार कमी असल्यामुळे मजुरांना कमी मजुरी देण्यात आल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे.
आलेसूर येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीला सन २0१३-१४ मध्ये रोपवनाची कामे मंजूर झाली होती. या खड्डय़ांच्या मजुरीकरिता तीन लाख रुपयांचा धनादेश वनविभागाने दिला होता. कमी मजुरीची रक्कम वनविभागाने रेकॉर्डवर घेतली आहे. नियमानुसार एक बाय एक फूट खड्डय़ाकरिता नऊ रुपये व दीड बाय दीड फुटाकरिता ११ रुपये मजुरी देण्यात येते. खड्डय़ाचा आकार एक बाय एक नाही असे वनविभागाने येथे सांगितले आहे. तो पूर्ण करण्याकरिता खर्च येईल, यासाठी मजुरी कमी केल्याचे सांगण्यात येत आहे. खड्डे तयार करत असताना वनविभागाचे येथे देखरेख व नियंत्रण असणे गरजेचे होते. यावेळी येथे कार्यरत कर्मचारी कार्यरत होते. त्यामुळे खड्डे खोदण्याची कामे सुरु असताना हे कर्मचारी काय करीत होते, असा प्रश्न मजुरांनी उपस्थित केला आहे.
येथे सुमारे ३५ हजार खड्डे २५ हेक्टर परिसरात तयार केले असे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे. परंतु ३५ हजार खड्डे तयार करण्यात आले का? कागदावर तर ती तयार केली नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. खड्डय़ांचा आकार कमी असल्याने झाडांचा जीव गुदमरतो, असे सांगण्यात येते. मजुरांचा जीव कमी मजुरीमुळे गुदमरत आहे. प्रत्येक खड्डय़ांचा आकार तपासणे गरजेचे झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)