रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर
By Admin | Updated: May 8, 2014 01:25 IST2014-05-08T01:25:55+5:302014-05-08T01:25:55+5:30
साकोली तालुक्यातील खैरी (आमगाव) येथे तेरवी कार्यक्रमात अन्नातून विषबाधा झालेल्यांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर
एकोडी : साकोली तालुक्यातील खैरी (आमगाव) येथे तेरवी कार्यक्रमात अन्नातून विषबाधा झालेल्यांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
खैरी येथील रहिवासी डोंगरवार यांच्या घरी तेरवीचा कार्यक्रम होता. त्यानुसार गावातील लोकांना जेवनाचा निमंत्रण देण्यात आले होते. परंतु जेवण केल्यानंतर काही वेळातच लोकांची प्रकृती बिघडल्याने खळबळ उडाली. लोक उलट्या, संडास व बेशुद्ध पडू लागले.
घटनेची माहिती मिळताच खैरी येथील आरोग्यसेवक चोपकर यांनी प्राथमिक उपचार करुन तात्काळ माहिती एकोडी प्राथमिक आरोग्य केंद्राला दिली. घटनेची माहिती मिळताच एकोडी प्राथमिक आरोग्य केंद्राची संपूर्ण चमू घटनास्थळी दाखल झाली. तेथे आरोग्य शिबिर लावून रुग्णांना सलाईन, औषधी उपचार करण्यात आला.
यावेळी सकाळी पहिल्याच टप्प्यात पुरुष ५0 व महिला ३६ यांची तपासणी करण्यात आली. नंतर उर्वरित गावकर्यांची सुद्धा तपासणी करण्यात आली. घटनेचे कारण शोधण्यासाठी पाण्याचे, विष्ठेचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. यामध्ये काहींची तपासणी करुन त्यांना तत्काळ सुटी देण्यात आली. काहींना उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.डोईफोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुखदेवे, बीडीओ व्ही.टी. बोरकर, डॉ.आंबेकर इत्यादींनी भेट दिली. डॉक्टर व त्यांच्या चमूच्या अथक प्रयत्नामुळे सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. यामध्ये एकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. मेघा गिर्हेपुंजे, डॉ. पराग देशमुख, डॉ. शहारे, आरोग्य सहाय्यक उमाकांत चटारे, आरोग्य सहाय्यीका फंदे, दोनोडे, हटवार, वाहन चालक किशोर गजबे, चोपकर, रामटेके, कवासे आदी कर्मचार्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)