रुग्णांचा आहार महागला
By Admin | Updated: January 6, 2015 22:54 IST2015-01-06T22:54:15+5:302015-01-06T22:54:15+5:30
विदर्भातील ११ जिल्हयात असलेल्या १३ रुग्णालयातील रुग्णांना अन्न पुरवठा करणाऱ्या स्वयंपाकगृहाचे खासगीकरण करण्यात आले. यामुळे पूर्वीच्या ६४ रुपये प्रति थाली ऐवजी ७४ रुपये प्रतिथाली

रुग्णांचा आहार महागला
रुग्णालयातील स्वयंपाकगृहाचे खासगीकरण : आता द्यावे लागणार ७४ रुपये
भंडारा : विदर्भातील ११ जिल्हयात असलेल्या १३ रुग्णालयातील रुग्णांना अन्न पुरवठा करणाऱ्या स्वयंपाकगृहाचे खासगीकरण करण्यात आले. यामुळे पूर्वीच्या ६४ रुपये प्रति थाली ऐवजी ७४ रुपये प्रतिथाली याप्रमाणे नविन कंत्राट देण्यात आले आहे. यामुळे रुग्णांना दिल्या जाणारे अन्न महाग झाले आहे. यामुळे शासनावर अतिरिक्त भार पडणार आहे. रुग्णालयातील रुग्णांसाठीचे स्वयंपाक गृह कंत्राटी पध्दतीने चालविण्याबाबत राज्याचे आरोग्य संचालकांतर्फे आदेश काढण्यात आला आहे.
विदर्भातील ११ जिल्हयातील रुग्णालयातील रुग्णांना दोन वेळचे जेवण, नास्ता व चहा पुरविण्यासाठीचे तीन वर्षाचे कंत्राट वर्धा येथील विदर्भ युवक स्वयंरोजगार सेवा सहकारी सोसायटी यांना देण्यात आले. विदर्भातील भंडारा, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर अमरावती, खामगांव महिला रुग्णालय, अकोला, नागपूर, अमरावती, बुलढाणा, वाशिम आदी ठिकाणी असलेल्या जिल्हा सामान्य रुगणालयातील स्वयंपाकगृहाचे खासगीकरण करण्यात आले आहे. पूर्वी स्वयंपाकगृहात शिजलेले अन्न रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून रुग्णाच्या बेडपर्यंत वाटप केले जात होते. मात्र कंत्राटीपध्दतीनंतर रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना जेवण पुरविण्यास मनाई करण्यात आली. शासनाने दिलेल्या निकषानुसार १०० ग्रॅम पोळी, १०० ग्रॅम भात, ७० ग्रॅम तूर डाळ, १२५ ग्रॅम भाजी पुरविल्या जाते. हे निकष कंत्राटदारासाठीही कायम ठेवण्यात आले. शिवाय रुग्णांना जेवण देण्यापूर्वी तपासणी केली आहे.
या संस्थेमार्फत ११ जिल्हयात प्रतिनिधी नेमून रुग्णालयात २५ डिसेंबरपासून रुग्णालयात मोफत जेवण पुरविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. एक, दोन रुग्णालय वगळता प्रत्येक जिल्हयात जिल्हा सामान्य रुग्णालयात शासनाने स्वतंत्रपणे प्रक्रिया सुरु झाली आहे.
प्रत्येक जिल्हयात जिल्हा सामान्य रुग्णालयात पुर्वी शासनाने स्वतंत्रपणे विचार करुन रुग्णांना जेवण देत होते. त्यावेळी प्रति थालीचा शासकीय दर ६४ रुपये निश्चित होता. शिवाय स्वयंपाक तयार करणारे शासकीय कर्मचारी असल्याने त्यांना पगार देण्यात येत होता. मात्र स्वयंपाकगृहाचे खासगीकरण केल्याने रुग्णालयात स्वयंपाकी म्हणून काम करणारे कर्मचारी अतिरिक्त ठरले. (नगर प्रतिनिधी)