लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : परभणी येथे संविधान शिल्पाची तोडफोडीच्या घटनेनंतर दगडफेक व तोडफोड केल्याप्रकरणी काही आंबेडकरी चळवळीतील युवकांना पोलिसांनी अटक करून न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली होती. यात सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाला. या प्रकरणी सोमवार १६ डिसेंबर रोजी रिपब्लिकन सेनेच्यावतीने आनंदराज आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर भंडारा येथे कॅन्डल मार्चचे आयोजन करीत घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
भंडारा शहरातून हा कॅन्डल मार्च महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून अभिवादन करून गांधी चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक त्रिमूर्ती चौक येथे समारोप करण्यात आला. त्याप्रसंगी समता सैनिक दलाच्यावतीने शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, यावेळी समता सैनिक दलाचे वरिष्ठ अधिकारी सी. डी. गवरे, विलास नागदेवे, श्रीराम बोरकर, यशराज धारगावे यांनी अभिवादन केले.
यावेळी सामाजिक चळवळीचे नेते परमानंद मेश्राम यांनी परभणी येथे पोलिसांकडून झालेल्या अत्याचाराची घटना व शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा मिळालेला पोस्टमार्टम रिपोर्ट विषयीची माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र पोलीसविरोधी घोषणा देत परभणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी पुरणलाल लोणारे, श्रीराम गणेर, सूर्यभान हुमणे, नाशिक चौरे, रवींद्र ढोके, प्रा. मंगेशवर बडगे, अमृत बनसोड, महादेव मेश्राम, सुशील नगराळे, यशवंत नंदेश्वर, कैलास टेंभुर्णे, मनसाराम दहिवले, विजय जाधव, प्रणिता मेश्राम, आर. आर. बनसोड, प्रल्हाद मेश्राम, भाऊराव बनसोड, कुंदन शेंडे, मुरलीधर भैसारे, अजय मेश्राम, पौर्णिमा मेश्राम, विनोद रामटेके, एस. एस. बोरकर, अजय तांबे, चंद्रशेखर खोब्रागडे, पायल गाणार, विनय बनसोड, विनीत देशपांडे, सचिन मेश्राम, चांद बागडे, यांच्यासह महिला व भीमसैनिकांची उपस्थिती होती. संचालन शशिकांत भोयर यांनी केले.