लाखनी तालुक्यात साथीचे आजार
By Admin | Updated: August 27, 2014 23:18 IST2014-08-27T23:18:07+5:302014-08-27T23:18:07+5:30
तालुक्यात साथीच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये वातावरणातील बदलामुळे तसेच कीटकांमुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तालुक्यामध्ये तापाचे रुग्ण घरोघरी दिसून येत आहेत.

लाखनी तालुक्यात साथीचे आजार
लाखनी : तालुक्यात साथीच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये वातावरणातील बदलामुळे तसेच कीटकांमुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तालुक्यामध्ये तापाचे रुग्ण घरोघरी दिसून येत आहेत. डेंग्यूसदृश १२ रुग्णांची नोंदणी झाली आहे.
सिपेवाडा व सावरी येथे डेंग्यूसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी आरोग्य विभागाने तात्काळ गावोगावी शिबिर लावावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तालुक्यातील निमगाव ०६, शिवणी ०३, रेंगेपार कोठा ०१, पिंपळगाव ०१, सिपेवाडा ०१ अशा १२ डेंग्यूसदृश्य रुग्णांची नोंदणी तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडे झाली असून हा आकडा अधिक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तालुक्यात ५ प्राथमिक आरोग्य केंद्र, २६ उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालय ०२ अशी आरोग्य केंद्रांची संख्या आहे. यामध्ये दररोज १४०० रुग्णांची तपासणी होत आहे. तर खाजगी दवाखान्यामध्येही यापेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत.
तालुक्यातील प्रत्येक घरोघरी साथीच्या तापाचे रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये ताप, विषमज्वर, टॉयफॉईड तसेच कावीळचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातून रेफर टू लाखनी किंवा रेफर टू भंडारा असा सल्ला मिळत असल्याने रुग्ण खाजगी दवाखान्यात उपचार करणे सोईचे मानतात. तालुक्यातील बरेच रुग्ण भंडाऱ्यातील नामवंत खाजगी डॉक्टरांकडे भरती होवून डेंग्यूचे उपचार घेत आहेत. याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असून आरोग्य विभागाने गावोगावी शिबिर लावून आरोग्याची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)