ज्ञानाचे केंद्र ठरली पालोरा शाळा
By Admin | Updated: August 12, 2014 23:36 IST2014-08-12T23:36:39+5:302014-08-12T23:36:39+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळेकडे उपरोधिकपणे बघितले जाते. मात्र मोहाडी तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय त्याला अपवाद ठरले आहे. उत्कृष्ट व गुणवंत विद्यार्थी तयार करण्याची

ज्ञानाचे केंद्र ठरली पालोरा शाळा
शाळेचे परिसर हिरवेगार : शालेय शिक्षणाबरोबर क्रीडा व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन
युवराज गोमासे - करडी
जिल्हा परिषदेच्या शाळेकडे उपरोधिकपणे बघितले जाते. मात्र मोहाडी तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय त्याला अपवाद ठरले आहे. उत्कृष्ट व गुणवंत विद्यार्थी तयार करण्याची परंपरा आजही सुरू आहे. सुसज्ज इमारत, भौतिक सुविधा, शालेय शिक्षणाबरोबर क्रीडा व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन येथील शाळेत विद्यार्थ्यांना मिळत असल्याने विविध स्पर्धामध्ये शाळेचे नाव चमकले आहे. शाळेसमोरील बगीचा येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
पालोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव मोहाडी तालुक्यातील नामवंत, गुणवंत शाळा म्हणून पुढे आले आहे. शाळेची सुसज्ज इमारत, प्रशाधनगृह, वर्गखोल्या, प्रशस्त क्रिडांगण, विविध खेळांचे साहित्य व प्रशिक्षण, आवारभिंत व सभोवताल फुल झाडांची, शोभीवंत झाडांची लागवड, स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी, बैठक व्यवस्था, ग्रंथालय व वाचन कक्ष, अभ्यासिका वर्ग, स्कॉलरशिप वर्ग, विविध स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन, स्वतंत्र प्रयोगशाळा व प्रायोजिक शिक्षण, सुंदर बगीचा, अध्यापकांचे निष्ठापूर्ण प्रामाणिक प्रयत्न व प्रोत्साहन भोजन कक्ष व कुचकर पोषण आहार, कर्मचाऱ्यांचे, पालक व गावकऱ्यांचे सहकार्य या भरवश्यावर शाळेने गुणवंत विद्यार्थी घडवित लौकीक मिळविला आहे.
शाळा समिती अध्यक्ष बाबू ठवकर यांची शाळेप्रती समर्पणाची भावना कामे खेचून आणण्याची शैली त्याचबरोबर प्राचार्या एस.बी. कुरैशी यांचे उत्कृष्ट व्यवस्थापन व समन्वय या बळावर शाळेने प्रगती साधल्याची कुबुली शाळा प्रशासनाने दिली आहे. प्रामाणिकता व गुणवत्ता यासाठी परिसरात शाळेचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. परिसरात अनेक शाळा स्पर्धेत असताना शाळेने साधलेली प्रगती खुणावण्यासारखी आहे.
शाळेत ग्रंथालय प्रमुखाची जबाबदारी शिक्षक के.पी. माने सांभाळतात. ग्रंथालयात वाचनासाठी १००१ पुस्तके आहेत. दरवर्षी शाळेत पुस्तकांची खरेदी करण्याबरोबर देणगीदारांकडूनही पुस्तके स्विकारली जातात. झाडांची लागवत करून आतापर्यंत ५० झाडे जगविली गेली. शाळेत १० शिक्षक, ४ शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग ५ ते १२ मध्ये एकूण ३०४ विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत.