पालांदूर पोलीसठाण्यात जल्लोश श्री गणेशाचा
By Admin | Updated: September 12, 2016 00:33 IST2016-09-12T00:33:32+5:302016-09-12T00:33:32+5:30
कधी नव्हे तो व्यक्ती गणेशाच्या प्रसादाकरिता ठाण्याच्या आवारात हजेरी लावतो.

पालांदूर पोलीसठाण्यात जल्लोश श्री गणेशाचा
सामाजिक प्रबोधन : मित्रत्वाची भूमिका स्वीकारण्याचे आव्हान, संगीत मैफीलीचे आयोजन
पालांदूर : कधी नव्हे तो व्यक्ती गणेशाच्या प्रसादाकरिता ठाण्याच्या आवारात हजेरी लावतो. पोलीस प्रेमाने आपुलकीने त्यांचे स्वागत करीत गणेशाकरिता दुर्वा, फुल देत जनतेच्या मनातील पोलिसांविषयी भीती, गैरसमज दूर करून सलोखा निर्माण करीत आहेत. गणेशभक्त तिर्थप्रसाद घेऊन घराकडे परततो. यावरूनचं लोकमान्य टिळकांच्या अपेक्षेप्रमाणे गणेशोत्सवाचे सामाजिक प्रबोधनाचे खरे माध्यम पालांदुरात दिसत आहे.
येथील पोलीस ठाण्यात २५ वर्षानंतर बाप्पाची स्थापना करीत हिंदू संस्कृतीचे जतन करून सामाजिक प्रबोधनाकरिता ठाणेदार मनोज वाढीवे यांनी पुढाकार घेतला. शुक्रवारला रात्री संगीत मैफलीच्या माध्यमातून गणरायाचा जल्लोश केला.
कुटुंबाचा प्रमुख (सुत्रधार) ज्या दृष्टीचा असेल तसे कार्य त्याच्या हातून घडते व त्याच्या मागोमाग इतरही सहकार्य करतात. सेवेचा भाव मनात रूजला असल्यास त्याची छबी आपोआपच समाज मनात घर करते. याचे तंतोतंत उदाहरण पालांदुरचे ठाणेदार आचरताना दिसतात. पोलीस जनतेचे मित्र असून तुमच्या सेवेत त्यांचे आयुष्य समर्पीत असल्याचे समाजातील गुन्हेगारी कमी नव्हे, बंद करण्याकरिता मोठी मदत होते. बाप्पाची स्थापना करून रोज दोन वेळ मनोभावे महाआरती होते. यात गावातील भक्तांचा उदंड प्रतिसाद लाभतो.
या तरूणांनी पालांदूर ठाणे हद्दीत प्रत्येक गावातील शिक्षक, सुशिक्षित बेरोजगार, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, पोलीस पाटील, सरपंच, प्रभावशाली व्यक्ती यांच्याशी सामाजिक सलोखा वाढवून समाजाला शांतता व कायद्याचे राज्य देण्याकरिता पालांदूर ठाण्याची टीम अग्रेसर दिसली. कालच्या भरगच्च गर्दीत भितीविरहीत आपुलकी व सलोख्याचा मान दिसला. सुमारे चार तास चाललेल्या या संगीत मैफीलीत महिलांची संख्या डोळ्यात भरणारी होती. याकरिता महिला पोलीसही सेवेत पुढे दिसल्या.
नवशक्ती माँ देवी जागरण ग्रुप बालाघाटच्या वतीने संगीत मैफल सजविण्यात आली. १० कलाकारांच्या साथीने गणेशाची स्तुतीसुमने गात माँ वैष्णोदेवी, माँ दुर्गा, माँ लक्ष्मी यांचा जागर मांडण्यात आला. डि.जे. मधुर आवाजात भक्तांनी आपला सुर मिसळत कार्यक्रमाला उपशिखरावर पोहचविला.
भक्तांच्या गर्दीत ठाण्याचा परिसर फुल्ल होता. कार्यक्रमाला सरपंच, पोलीस पाटील, पोलीस मित्र, बचत गट, प्रभावशाली व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, महिला वर्ग, बच्चेकंपनी मोठ्या संख्येनी हजर होती. उपस्थितांचे ठाणेदार मनोज वाढीवे, पोलीस पियुष बाच्छल, कचरू शेंडे, मेश्राम, वच्छला यांनी शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करीत सहकार्याबद्दल अभिवादन केले. यशस्वितेकरिता ठाण्यात सर्व कर्मचाऱ्यांनी, होमगार्ड यांनी सहकार्य केले. नागरिकांची उपस्थिती लक्षवेधक होती. (वार्ताहर)