नेरला उपसा सिंचनअंतर्गत पालांदूर वितरिका थंडबस्त्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:24 IST2021-07-15T04:24:29+5:302021-07-15T04:24:29+5:30

मुखरू बागडे पालांदूर : महत्त्वाकांक्षी गोसेखुर्दअंतर्गत नेरला उपसा सिंचनच्या माध्यमातून पालांदूरला नियोजित आहे; परंतु प्रशासनाच्या वेळकाढू धोरणाने ...

Palandur distribution under Nerla Upsa Irrigation in cold storage! | नेरला उपसा सिंचनअंतर्गत पालांदूर वितरिका थंडबस्त्यात!

नेरला उपसा सिंचनअंतर्गत पालांदूर वितरिका थंडबस्त्यात!

मुखरू बागडे

पालांदूर : महत्त्वाकांक्षी गोसेखुर्दअंतर्गत नेरला उपसा सिंचनच्या माध्यमातून पालांदूरला नियोजित आहे; परंतु प्रशासनाच्या वेळकाढू धोरणाने अजूनपर्यंत पालांदूर वितरिकेचे काम प्रगतिपथावर नसल्याने पालांदूरवाशी सिंचनाच्या प्रतीक्षेत आहेत. सदर कालवा, अर्थात पालांदूर वितरिका जेवणाळा सीमेपर्यंत अर्थात मचारना इथपर्यंत येऊन थांबलेली आहे.

जेवणाळा इथून पालांदूरपर्यंतच्या मार्गात ०.८४ हेक्टर जमीन झुडपी जंगल कायद्यांतर्गत येत असल्याचे सांगतात. त्यामुळे पुढील काम कायद्याच्या कचाट्यात पडलेले आहे. नेमकी समस्या वन कायद्याची, की महसूलची ही सुद्धा समस्या आ वासून उभी आहे. सदरचा विषय जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत सोडविण्याकरिता नेरला उपसा सिंचन प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु त्यांना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने प्रकरण वेळकाढू धोरणात अडलेले आहे.

जेवणाळा ते पालांदूर हा दोन किलोमीटर अंतराचा उघडा कालवा अजूनही कागदावरच आहे. गत वर्षभरापूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या दालनात या विषयाला हात लागला होता. पालांदूरचे ज्येष्ठ नेते दामाजी खंडाईत यांनी हा विषय उचलून धरला होता. सिंचनाचा विषय असल्याने नाना पटोले यांनी तत्काळ विषयाला मार्गी लावण्याच्या सूचना नेरला उपसा सिंचन प्रशासनाला दिले होते. संबंधित अधिकारी वर्ग पालांदूर ते जेवणाळा या नहरावर पोहोचले होते. वर्षभरात काम मार्गी लागण्याची आशा बळावली होती. मात्र नेरला उपसा सिंचनअंतर्गत पालांदूर वितरिकेची प्रभावित जमीन झुडपी जंगलाची की, महसूलची हा प्रश्न अजूनपर्यंत निर्धारित न झाल्याने काम ठप्प पडले आहे.

चौकट /डब्बा

तीस वर्षांनंतरही गोसे खुर्दचे पाणी पालांदूरच्या शेतकऱ्यांना मिळालेले नाही. मार्च महिना लागला की पाणीटंचाईचा सामना पालांदूरवासीयांना करावा लागतो. या समस्येला कायमस्वरूपी मार्गी लावण्याकरिता गोसेखुर्दचे पाणी नेरला उपसा सिंचन योजनेंतर्गत पालांदूर वितरिकेच्या माध्यमातून नियोजित केलेले आहे. मात्र, नित्याप्रमाणे प्रशासनाच्या धीम्या चालीने प्रकरण ‘जैसे थे’ आहे. पालांदूर परिसरात कित्येक शेतकरी आजही कोरडवाहू आहेत. स्वतंत्र व शासकीय योजनेतून विहीर, बोरवेल्स, फिल्टर निकामी होत आहेत. अशा संकटसमयी गोसेचे पाणी आल्यास पालांदूर परिसर जलमय होण्यास मोठी मदत शक्य आहे.

कोट बॉक्स

नेरला उपसा सिंचन योजनेंतर्गत पालांदूर वितरिका प्रशासकीय अडचणीत सापडलेली आहे. त्या समस्येवर तोडगा काढण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क सुरू आहेत. शक्य तितक्या लवकर प्रयत्न करून पालांदूर वितरिकेचे काम सुरू केले जाईल.

सुनील भुरे उपविभागीय अभियंता, नेरला उपसा सिंचन योजना, अड्याळ

गोसे खुर्दअंतर्गत पालांदूर वितरिकेचे काम मचारना इथपर्यंतच आलेले आहे. जेवणाळा येथील हल्लीच्या नर्सरीच्या जागेतून भूमिगत काम करून पालांदूरपर्यंत पोहोचविण्याकरिता ग्रामपंचायत जेवणाळाने २०१८ ला ग्रामसभेचा ठरावासह ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. ती जमीन चराईसाठी संरक्षित असल्याने बांधकाम भूमिगत करावे. त्यामुळे सिंचनाचे काम होऊन वन्यप्राण्यांसह गुरांना चराईसाठी जागा सुरक्षित राहील. खुला नहर केल्यास पाळीव प्राण्यांसह गावकऱ्यांनासुद्धा समस्येला सामोरे जावे लागणार आहे. जेवणाळा पुढील कवडशी येथील प्रभावित ८ शेतकरीसुद्धा मोबदला न घेता भूमिगत नहराकरिता सकारात्मक आहेत. नेरला उपसा सिंचन योजनेचे अधिकारी वेळकाढू धोरण करीत आहेत. सकारात्मक विचार ठेवून नेमक्या अडचणीवर चर्चा करून सामंजस्याने प्रश्न मार्गी लावण्याची नितांत गरज आहे.

विनायक बुरडे

माजी सभापती जि.प., भंडारा

Web Title: Palandur distribution under Nerla Upsa Irrigation in cold storage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.