आधारभूत किमतीनुसार धान चुकारे मिळाले, पण बोनसचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:32 IST2021-03-07T04:32:33+5:302021-03-07T04:32:33+5:30
लाखांदूर : शासनाच्या आधारभूत किंमत योजनेनुसार तालुक्यात १४ खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्यात आली. शेतकऱ्यांना ...

आधारभूत किमतीनुसार धान चुकारे मिळाले, पण बोनसचे काय?
लाखांदूर : शासनाच्या आधारभूत किंमत योजनेनुसार तालुक्यात १४ खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्यात आली. शेतकऱ्यांना आधारभूत किमतीनुसार चुकारे देण्यात आले आहेत. मात्र, राज्य शासनाने घोषित केलेल्या बोनसच्या रकमेचे काय झाले, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
यंदाच्या खरीप हंगामात लाखांदूर तालुक्यात शासनाच्या आधारभूत किंमत योजनेनुसार जवळपास १४ केंद्र सुरु करण्यात आली. ही केंद्र तालुक्यातील विजयलक्ष्मी राईस मिल, खरेदी-विक्री संस्था व पंचशील भात गिरणी सहकारी संस्था या तीन संस्थांतर्गत सुरु करण्यात आली. त्यानुसार या केंद्रांतर्गत तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी होऊन खरेदींतर्गत धानाचे काही प्रमाणात चुकारे अदा करण्यात आले आहेत.
हे चुकारे १,८६८ रुपये प्रतिक़्विंटल या आधारभूत किमतीनुसार देण्यात आल्याची माहिती आहे. तथापि, राज्य शासनाने आधारभूत केंद्रावर धान विक्रेत्या शेतकऱ्यांना प्रतिक़्विंटल ७०० रुपये बोनस जाहीर केला आहे. या बोनसचा लाभ कधी मिळणार, असा प्रश्न आता शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.
दरम्यान, यंदाच्या खरिपात पूर, कीडरोग व अन्य आपत्तींमुळे लागवडीखालील पिकांचे प्रचंड नुकसान होऊन उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. या परिस्थितीत या भागातील धान उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता, धान चुकारे अदा करताना राज्य शासनाने बोनसचा लाभही तत्काळ देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.