धान सडले
By Admin | Updated: June 24, 2015 00:59 IST2015-06-24T00:59:50+5:302015-06-24T00:59:50+5:30
शेतकऱ्यांच्या धान्याला हमी भाव मिळावा म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या मान्यतेने तालुकास्तरावर आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू केले.

धान सडले
लाखांदूर : शेतकऱ्यांच्या धान्याला हमी भाव मिळावा म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या मान्यतेने तालुकास्तरावर आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू केले. खरेदी केलेल्या धान्याचे चुकारे पूर्णत: अडले असून मोजणीकरीता ठेवलेले हजारो क्विंटल धान पाण्यात सडले. यामुळे पीक कर्जाच्या परतफेडीसाठी शेतकरी कोंडीत सापडला आहे.
तालुक्यात धानाला हमीभाव प्रती क्विंटल १,३६० रूपये मिळत असल्याने शेतकऱ्यांनी दलालाकडून होणारी लुट थांबविण्यासाठी आधारभूत धान्य खरेदी केंद्राकडे धाव घेतली. तालुक्यात विजय लक्ष्मी सह. राईस मिल अंतर्गत लाखांदूर, पुयार, दिघोरी, बारव्हा येथे केंद्र सुरू केले. खरेदी विक्री सहकारी संस्थेअंतर्गत सरांडी, भागडी, हरदोली, दिघोरी येथे केंद्र सुरू करण्यात आले. पंचशील राईस मिल मासळ येथे सुद्धा धान्य खरेदी करण्यात आले. विजय लक्ष्मी सह करा राईस मिल केंद्रावर सध्यास्थितीत १२,११२ क्विंटल धान्याची खरेदी करण्यात आली. एकूण १ कोटी ६४ लक्ष ७२ हजार ३२० रूपयांचे चुकारे मागील एक महिन्यापासून अडून आहेत. हीच परिस्थिती सर्व केंद्रावर दिसून येते. तालुक्यातील सर्व आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष भेट दिली असता विघटक परिस्थिती आढळून आली. एकीकडे धान्याचे चुकारे अडले असताना हजारो क्विंटल धान्य उघड्यावर पडून आहे. पावसाचे पाणी जमा झाल्याने हजारो क्विंटल धान्य पाण्यात भिजले.. धानाला कोंब निघाल्याने केंद्रावरील कर्मचारी धान्य मोजण्यास मनाई करीत आहेत. धान्य खरेदीची अंतिम तारीख जवळ येत असल्याने या कालावधीत धान्य मोजणे शक्य नाही. परिणामी कर्मचारी शेतकऱ्यांना धान्य परत नेण्यासाठी दमदाटी करीत आहेत. सडलेले धान्य शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे.
धान्य खरेदीसाठी मुदत वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. धान्य खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून अद्याप चुकारे मिळाले नसल्याने खरीप पिकासाठी शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत सापडणार आहे. (तालुका प्रतिनिधी)